आजपासून विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज, २२ सप्टेंबरला जाहीर होणार गुणवत्ता यादी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई, अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ३ फेरी आतापर्यंत पार पडल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मुख्य ३ फेऱ्यांत अद्याप प्रवेश मिळालेला नाही किंवा प्रथम क्रमांकाचे पसंतीचे महाविद्यालय मिळूही ज्यांना प्रवेश घेता आलेला नाही त्यांना विशेष फेरीद्वारे पुन्हा प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. शिक्षण संचालनायालयाद्वारे अकरावीचे विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १७ सप्टेंबर म्हणजेच आजपासून विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज करता येणार आहे. शिक्षण संचलनालयाकडून तिसऱ्या यादीसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
येत्या २२ सप्टेंबरला विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी मुदत देण्यात येणार आहे. दरम्यान, २० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात येणार असून यापूर्वी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जात बदल करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे आतापर्यंत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना पहिला व दुसरा असे दोन्हीही भाग भरता येणार आहेत. मात्र, भाग दोन भरून लॉक करणारे विद्यार्थीच विशेष फेरीसाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे नियोजित कालावधीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरून तो तपासून घ्यावा, असेही जगताप यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना प्राप्त महाविद्यालयांची माहिती लॉगीनमध्ये मिळून विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीच कट ऑफ ही पाहायला मिळणार आहे. विशेष फेरीनंतर २५ सप्टेंबरला अकरावीची रिक्त जागांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी महिती संचालनालयाकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात देण्यात आली आहे.
विशेष फेरीचे वेळापत्रक
*१६ सप्टेंबर - प्रवेशाच्या रिक्त जागा प्रसिद्ध करणे.
* १७ सप्टेंबर - विशेष फेरीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात.
* १७ ते २० सप्टेंबर - कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार.
* २१ सप्टेंबर - डाटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ
* २२ सप्टेंबर- महाविद्यालय प्रवेशाची अलॉटमेंट यादी, कट-ऑफ प्रसिद्ध करणे.
* २२ ते २५ सप्टेंबर -विद्यार्थ्यांनी प्राप्त महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करणे.