लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- राज्यातील १८ ते ४४ वयोगटांतील जनतेला मोफत लस देण्याची ठाकरे सरकारची घोषणा म्हणजे लबाडाघरचे आवताण असल्याची टीका कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर भातखळकरांनी ठाकरे सरकारला मोफत लसीच्या मुद्यावरून लक्ष्य केले. ठाकरे सरकारने मोफत लसीची घोषणा केली असली, तरी खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस विकतच मिळणार आहे, असे ते म्हणाले.
केंद्राकडून लस मिळत नसल्याचे तुणतुणे राज्य सरकारने जारी ठेवले आहे. लस मिळत नसल्याने मोफत लस देता येत नाही, असे रडगाणे गाण्यापेक्षा खुल्या बाजारातून ठाकरे सरकार येत्या १५-२० दिवसांत किती लसी विकत घेऊन जनतेला मोफत देणार आहे, हे त्यांनी आधी जाहीर करावे, असे आव्हान भातखळकर यांनी दिले आहे.
केंद्र सरकारने लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ५० टक्के लस विकण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे राज्य सरकारला लस विकत घेण्यात काही अडचण येऊ नये. त्यामुळे ठाकरे सरकारची घोषणा ही सवंग लोकप्रियतेसाठी नसून लोकांच्या भल्यासाठी आहे, असा संदेशही लोकांपर्यंत जाईल, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.