म्हाडाची सोडत जाहीर व्हायला सुरूवात, ८१९ घरांसाठी सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 11:21 AM2017-11-10T11:21:41+5:302017-11-10T13:14:05+5:30
गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हाडा सोडतीला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १०.३० वाजता सुरूवात झाली आहे.
मुंबई : गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हाडा सोडतीला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १०.३० वाजता सुरूवात झाली आहे. ८१९ घरांसाठी ही सोडत काढण्यात येत आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यद आणि अभिनेता मिलिंद शिंदे यांना म्हाडाची लॉटरी लागली आहे. म्हाडाच्या घराची सोडत जाहीर होताच विजेत्यांनी आनंद व्यक्त केलं. मुंबईतील घराचं स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली जातीये.
गेल्या चार वर्षापासून म्हाडाचं घर लागावं यासाठी अर्ज भरत होते पण लॉटरीमध्ये नाव येत नव्हतं, आज चार वर्षांनी लॉटरीमध्ये नाव आल्याने घराचं स्वप्न साकार झाल्याचं विजेत्या सुगंधाबाई कुरुडे यांनी म्हंटलं. सुगंधाबाई कुरुडे यांना विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे म्हाडाचं घर लागलं.
गोरेगावला पाच हजार घरे बांधणार असून या संदर्भातील उद्या निविदा काढली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत राज्यात अडीच लाख घरे बांधणार आहोत. त्यापैकी पन्नास हजार घरे मुंबई महानगर प्रदेशात बांधणार आहोत, असं यावेळी विनोद तावडे यांनी म्हंटलं.
लोकांचे स्वप्न घेऊन ही सकाळ आली आहे. युतीचे शासन आल्यापासून सोडत पारदर्शक झाली आहे. सोडतीमध्ये लागलेले घर वेळेत दिले जाईल. भविष्यात अधिकाधिक परवडणारी घरे बांधणार असल्याचं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हंटलं.
रंगशारदा सभागृहातील मोकळ्या जागेत अर्जदारांना निकाल पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात येत आहे. संकेतस्थळावर "वेबकास्टिंग" तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live telecast) बघण्याची सुविधा http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://www.facebook.com/mhadal2017 या लिंकवर सोडतीचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण अर्जदारांना घरबसल्या बघायला मिळत आहे. सोडतीचा निकाल सायंकाळी सहा वाजता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.