१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी कालावधीची घोषणा; मच्छिमार बोटी किनाऱ्याला
By मनोहर कुंभेजकर | Published: May 27, 2023 05:36 PM2023-05-27T17:36:27+5:302023-05-27T17:37:06+5:30
मच्छिमार बोटी किनाऱ्याला शाकारायला झाली सुरुवात
मुंबई- : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये दि. १ जून ते ३१ जुलै या कालावधीमध्ये मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केले आहेत. यामुळे या आदेशाचे पालन करण्यासाठी मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मालवणी,मनोरी,गोराई,जुहू,खारदांडा,माहीम, वरळी, माहुल, कुलाबा आदी विविध कोळीवाड्यांमधील मच्छिमार बोटी येथील सागरी किनाऱ्यांवर शाकारायला( नांगरायला) सुरवात झाली आहे.परिणामी मुंबईसह राज्यात सागरी किनारपट्टीवर मासेमारी दोन महिन्यांसाठी बंद राहणार असून मासळी बाजारांमध्ये शुकशुकाट असणार आहे. त्यामुळे दोन महिने ताजी मासळी मत्स्यप्रेमी खवय्यांना खायला मिळणार नाही. कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी लोकमतला ही माहिती दिली.
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जीवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ च्या कलम ४च्या पोट कलमाद्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून) राज्याच्या जलधी क्षेत्रात मच्छिमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते.या कालावधीत खराब / वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्त हानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मच्छिमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली असल्याचे शासकीय परिपत्रक मत्स्यव्यवसाय खात्याने जारी केल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली. सदर पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार असून ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकास केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू राहतील असे या परिपत्रकात नमूद केले आहे.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.