मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यात २५१ तालुक्यातील १४ हजार गावांच्या भूजलपातळीत झालेली घट लक्षात घेता, दुष्काळ जाहीर करण्यासाठीची २०१६ ची संहिता रद्द करुन पूर्वीप्रमाणे आणेवारी पद्धत लागू करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.दुष्काळ जाहीर करण्याची संहिता २०१६ मध्ये केंद्राने मंजूर केली व राज्याने स्विकारली. परंतु त्या संहितेतील निकष महाराष्ट्रालालागू करणे योग्य होणार नाही. राज्याच्या अनेक भागात भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. तसेच ज्या शास्त्रोक्त निकषांवर दुष्काळ जाहीर केला जातो, त्यांचा अभ्यास व अंमलबाजवणीस राज्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, त्यामुळे जुन्या आणेवारी पद्धतीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.कर्नाटक, केरळ, तेलंगणा, तामिळनाडूसारख्या राज्यांनी याआधीच नवीन पद्धतीला विरोध दर्शवला आहे. राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि भूजल पातळीतील गंभीर घट लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील केंद्राची नवीन पद्धत रद्द करण्यात यावी व जून्या आणेवारी पद्धतीने दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे, असेही मुंडे यांनी याबाबत बोलताना सांगितले.
‘जुन्या आणेवारी पद्धतीने दुष्काळ जाहीर करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:21 AM