अतुल भातखळकर यांचे आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरेमधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरेमध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे, हे अत्यंत संतापजनक असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
आरेमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असतानाही ठाकरे सरकारने आरेमधील तब्बल ३२३१० वर्गफुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. इतकेच नव्हे तर हा परिसर संवेदनशील क्षेत्र असतानाही केवळ बिल्डरांच्या सोबत असलेल्या ‘आर्थिक’ संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतःसह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे हे उद्योग सुरू आहेत. याविरोधात भारतीय जनता पक्षाने मोठे जनआंदोलन उभारले व गरज पडल्यास उच्च न्यायालयातही जाणार असल्याचा इशारासुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
.....................................................