स्वराज्याच्या घोषणेचा लखनौमध्ये उत्सव, लोकमान्य टिळकांनी केली होती घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 07:25 AM2017-12-31T07:25:30+5:302017-12-31T07:25:38+5:30
लोकमान्य टिळ कांनी लखनौ येथे २९ डिसेंबर १९१६ रोजी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा केली होती.
मुंबई : लोकमान्य टिळ कांनी लखनौ येथे २९ डिसेंबर १९१६ रोजी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा केली होती. या घटनेला १०१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारने लखनौतील लोकभवनात एका विशेष सोहळ्याचे शनिवारी आयोजन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य अतिथी होते.
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला तेथील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हृदयनारायण दीक्षित, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा, महिला कल्याण पर्यटन मंत्री रिता बहुगुणा-जोशी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते.
फडणवीस यावेळी म्हणाले की, लोकमान्यांच्या स्वराज्यविषयक घोषणेने स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलण्यासह जुलमी ब्रिटिश राजवटीला उलथून टाकण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागवला. युवा शक्तीचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण होत असताना
युवा पिढीला निव्वळ आधुनिक शिक्षण व प्रगत तंत्रज्ञान देऊन चालणार नाही. त्यासोबत या पिढीला संस्कार, राष्ट्रीयत्व शिकविले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील एका चित्र प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली. त्यानंतर फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची लखनौ येथील राजभवनात भेट घेतली.
सामंजस्य करार
एक भारत-श्रेष्ठ भारत या संकल्पनेला अनुसरुन कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दरम्यान एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.