मुंबई विद्यापीठ अधिसभा व अभ्यासमंडळाच्या निवडणूकीची दुरुस्त तात्पुरती मतदार यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 12:16 PM2017-12-10T12:16:56+5:302017-12-10T12:17:02+5:30
मुंबई विद्यापीठाने अधिसभेच्या प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी,विद्यापीठ अध्यापक व अभ्यास मंडळाच्या महाविद्यालयातील विभाग प्रमुख या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आक्षेपानंतर दुरुस्त केलेली तात्पुरती मतदार यादी काल जाहीर करण्यात आली
मुंबई : मुंबई विद्यापीठाने अधिसभेच्या प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी,विद्यापीठ अध्यापक व अभ्यास मंडळाच्या महाविद्यालयातील विभाग प्रमुख या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आक्षेपानंतर दुरुस्त केलेली तात्पुरती मतदार यादी काल जाहीर करण्यात आली. या निवडणुकीची अधिसूचना विद्यापीठाने २ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध केली होती व तात्पुरती मतदार यादी जाहीर केली होती. यानंतर मतदार यादीस कोणाचे काही आक्षेप असल्यास ते लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याची अंतिम तारीख
६ डिसेंबर २०१७ पर्यंत होती. वरील चार घटकाच्या मतदार यादीस विद्यापीठाकडे अनेक आक्षेप प्राप्त झाले. तसेच काही त्रुटी विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आल्या.या त्रुटी व आक्षेपाची छाननी करून तात्पुरत्या स्वरूपातील मतदार यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली आहे. तसेच ही यादी अवलोकनार्थ मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कार्यालयातही उपलब्ध आहे.
ज्यांना या दुरुस्त केलेल्या मतदार यादीस काही आक्षेप असल्यास त्यांना कुलगुरूंकडे अपील करता येईल. त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह हे अपील मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट विभागातील निवडणूक विभागात दिनांक १३ डिसेंबर २०१७ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावे.
या अधिसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी,विद्यापीठ अध्यापक व अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख अशा चार घटकांच्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात शिक्षक व नोंदणीकृत पदवीधर घटकांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात अधिसभेवर जाण्यासाठी १९ जागा व अभ्यास मंडळावर जाण्यासाठी ३ अशा एकूण २२ जागा असतील.
निवडणुकीचे घटक व जागा
घटक जागा
1. प्राचार्य १०
2. संस्था प्रतिनिधी ६
3. विद्यापीठ अध्यापक ३
4. महाविद्यालयातील विभाग प्रमुख ३
एकूण जागा : २२
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील आक्षेपांची नियमानुसार छाननी करून सुधारित तात्पुरती मतदार यादी जाहीर केली आहे. यावर काही आक्षेप असतील तर ते अपील स्वरूपात कुलगुरूंकडे निर्धारित वेळेत दयावेत. या निवडणुकीसाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे ही विनंती.
- डॉ. दिनेश कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारीतथा कुलसचिव मुंबई विद्यापीठ