मुंबई : राज्यातील सर्व बिगर कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये यापुढे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीताने करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.तसेच प्रत्येक महाविद्यालयाचा नामफलक यापुढे केवळ मराठीतच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यासंदर्भातील शासकीय आदेश येत्या एकदोन दिवसात काढला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात सामंत यांच्या हस्ते झाले; त्यावेळी ते बोलत होते. बाळशास्री जांभेकर हे या महाविद्यालयाचे पहिले बिगर ब्रिटिश प्राध्यापक होते. सदर महाविद्यालय आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.जांभेकर यांचे मूळ गाव असलेल्या कोकणातील पोंभुर्ले गावातील त्यांचे स्मारक अधिक भव्य करण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी सामंत यांनी यावेळी जाहीर केला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधुरी कागलकर, पत्रकार कल्याण निधीचे रवींद्र बेडकीहाळ, शिवडीकर, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलिप सपाटे, कोषाध्यक्ष महेश पावसकर, राज्य अधिस्वीकृती समितीचे माजी अध्यक्ष यदु जोशी यांची यावेळी भाषणे झाली. बेडकीहाळ यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात दर्जेदार प्रशिक्षण संस्थेची मागणी केली.‘एल्फिन्स्टन’मध्ये पत्रकारिता प्रशिक्षण संस्थाएल्फिन्स्टन महाविद्यालयात लवकरच पत्रकारितेतील विविध प्रवाह, तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारा आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येईल,अशी घोषणाही मंत्री सामंत यांनी केली. या महाविद्यालयाचे सभागृह सुसज्ज करण्यासाठी २ कोटी रुपये राज्य शासन देईल, असे त्यांनी जाहीर केले. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीसाठी स्वतंत्र कुलगुरुंची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठ, महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने - उदय सामंत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 5:02 AM