मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, सांगलीसह ८ महापालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी, तर एकूण १४ महापालिकांची महापौरपदे महिलांसाठी राखीव झाली आहेत. मंत्रालयात बुधवारी राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या.या महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्वीच संपुष्टात आला होता. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या महापौरपदांना मुदतवाढ देण्यात आली होती. आजच्या आरक्षण सोडतीतून २००७ पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महापालिकांना वगळण्यात आले, तसेच इतर संवर्गाचे महापौर असलेल्या ठिकाणी त्याच संवर्गाचा पुन्हा महापौर होणार नाही, हे ठरविण्यात आले होते. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली या सोडती काढण्यात आल्या. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महापालिकांचे महापौर, उपमहापौर, पदाधिकारी, नगरविकास विभाग आणि महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते.>असे आहे आरक्षण : अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : वसई-विरार ।अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : मीरा-भार्इंदर । अनुसूचित जाती (महिला) : अहमदनगर, परभणी । नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, धुळे, अमरावती ।नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : नांदेड-वाघाळा, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव ।खुला (सर्वसाधारण) : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली,सांगली, उल्हासनगर। खुला (महिला) : नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला,पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर
२७ महापालिकांमधील महापौरपदाची सोडत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 6:41 AM