Join us

येत्या काही दिवसांत हाेणार दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील निर्णयाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:06 AM

शिक्षणमंत्री; सोशल मीडियाद्वारे साधला विद्यार्थी, पालकांशी संवादआदित्य ठाकरेंनीही केले ट्विटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संकट काळात ...

शिक्षणमंत्री; सोशल मीडियाद्वारे साधला विद्यार्थी, पालकांशी संवाद

आदित्य ठाकरेंनीही केले ट्विट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचा अभ्यास तणावाखाली सुरू आहे. परीक्षेविषयी अस्वस्थता आहे, याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विविध पक्षीय लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आदींसोबत चर्चा करत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे विद्यार्थी, पालकांशी संवाद साधताना दिली. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच सर्वप्रथम जबाबदारी असून शिक्षण विभाग या परिस्थितीचा आढावा घेत असून यासंदर्भात येत्या चार ते पाच दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभाग विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेणार असल्याचे समजते. शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांसोबत झालेल्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत न घेता ती जूनमध्ये घेण्याचे ठरल्याचे कळते. परंतु याबाबत अधिकृत माहिती येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

राज्यात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती पाहता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली. भाजपचे आशिष शेलार यांनीही या परीक्षा पुढे ढकलत वेगवेगळ्या मोडमध्ये परीक्षा घ्यावी अशी मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी, राज्यातील परीक्षेपूर्वी प्रक्रियेतील सर्वांचे लसीकरण करावे, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी समाजातील सर्व घटकांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले.

* आदित्य ठाकरेंनीही केले ट्विट

कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांना मी देखील विनंती केली आहे की, विद्यार्थ्यांचे आराेग्यही महत्त्वाचे आहे. करिअर महत्त्वाचे आहेच, पण त्यासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्यही महत्त्वाचे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनीही सांगितल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले.