शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
By admin | Published: March 2, 2015 10:40 PM2015-03-02T22:40:22+5:302015-03-02T22:40:22+5:30
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने आंबा, काजू, वाल आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने आंबा, काजू, वाल आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदतीचा हात देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद एक कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज येथे जाहीर केले.
एक कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना सर्वप्रथम जाहीर करणारी रायगड जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शनिवार आणि रविवार अशा सलग दोन दिवस पावसाने रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास गेला. अस्मानी संकटाने मोठ्या संख्येने आर्थिक हानी होणार यामुळे बळीराजा कमालीचा चिंताग्रस्त झाला होता.
उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी याप्रकरणी अध्यक्ष सुरेश टोकरे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना संकटातून सोडविण्यासाठी तातडीने त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे, अशी विनंती म्हात्रे यांनी टोकरे यांना केली. त्यावर टोकरे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबाबत तात्काळ मान्यता दिली. मदत किती असावी याबाबत टोकरे आणि म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर विचार विनिमय केला. आर्थिक मदत किमान एक कोटी रुपये द्यावी यावर अध्यक्ष टोकरे यांच्या दालनात एकमत झाले. त्यानंतर त्यांनी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. रायगड जिल्हा परिषद गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभी राहील असे टोकरे यांनी सांगितले.
अध्यक्षांनी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करुन रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला असून राज्यात असा निर्णय सर्वप्रथम घेणारी रायगड जिल्हा परिषद एकमेव असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.