संतापजनक! नाश्त्यात मिळतोय अळ्यांचा शिरा, आरे कॉलनी क्वारंटाइन सेंटरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:51 AM2020-07-05T05:51:52+5:302020-07-05T05:52:48+5:30
आरे कॉलनीच्या रॉयल पंप इस्टेट १६९ या ठिकाणी कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र त्यांच्या आरोग्याशीच खेळ खेळण्याचा प्रकार सध्या येथे घडत असल्याचे येथे राहत असलेल्यांचे म्हणणे आहे.
मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरातील हॉटेल क्वॉरंटाइन सेंटरमध्ये रोज सकाळी अळ्या असलेला शिरा नाश्त्यात दिला जात असल्याचा आरोप येथील लोकांनी केला आहे. यामुळे विशेषत: लहान मुलांवर उपाशीच राहण्याची वेळ येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आरे कॉलनीच्या रॉयल पंप इस्टेट १६९ या ठिकाणी कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र त्यांच्या आरोग्याशीच खेळ खेळण्याचा प्रकार सध्या येथे घडत असल्याचे येथे राहत असलेल्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ त्यांनी लोकमतला पाठविले आहेत. सकाळी दिल्या जाणाऱ्या नाश्त्यामध्ये रोजच अळ्या सापडत असल्याचा आरोप अमित टेमकर या व्यक्तीने केला. त्यांचे नातेवाईक येथे क्वारंटाइन आहेत. येथे पोटभर जेवण मिळत नाही. त्यातच नाश्त्यामध्ये अळ्या सापडत असल्याने जेवावेसे वाटत नाही. जनावरांपेक्षाही वाईट पद्धतीने वागविले जात असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे.
याबाबत येथील अन्नवाटपाची जबाबदारी पाहणाºया पी दक्षिणचे सहायक अभियंता मंदार चौधरी यांच्याकडे लोकमतने विचारणा केली असता, ‘मला या प्रकाराबद्दल अद्याप काही माहिती अथवा तक्रार मिळालेली नाही. त्यामुळे मी आधी या संपूर्ण प्रकारणाची माहिती घेतो’, असे उत्तर त्यांनी दिले.
अळी शिजली कशी नाही?
पी दक्षिण विभागातील क्वारंटाइन सेंटरमध्ये यापूर्वीही जेवणामध्ये अळी सापडल्याचा प्रकार घडला होता. त्या वेळी अन्न तपासणीदरम्यान अन्न शिजले, मग त्यात सापडलेली अळी का शिजली नाही, यावरून संशय व्यक्त केला जात होता.
मात्र नंतर त्या कंत्राटदाराचे कंत्राट काढून नवीन व्यक्तीला देण्यात आले. मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्याचे येथे क्वारंटाइन केलेल्यांचे म्हणणे आहे.
आरोग्य तपासणी केली; अपाय नाही
मला याबाबत माहिती मिळाल्यानंतर मी तातडीने पथकासह संबंधित ठिकाणी भेट देत प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली आहे. मात्र कोणालाही जेवणातून विषबाधा तसेच अन्य काही अपाय झाल्याचे उघड झालेले नाही.
- नितीश ठाकूर,
आरोग्य अधिकारी, पी दक्षिण विभाग