आयकर विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयकर विभागाने मरिन ड्राइव्ह येथील अल जाब्रिया कोर्ट इमारत बेनामी मालमत्ता म्हणून शुक्रवारी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांतील पैसे गुंतविल्याच्या संशयावरून या इमारतीच्या व्यवहाराची चौकशी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीची बाजार भावानुसार किंमत १०० कोटी आहे. ज्या कंपनीने या इमारतीची खरेदी केली होती, त्या कंपनीकडे इमारत खरेदीसाठी त्या दरम्यान पुरेसे पैसेही नव्हते, असे त्यावेळी चौकशीत समोर आले. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसे या इमारतीच्या खरेदीसाठी वापरला असल्याचा ईडीला संशय होता. यात व्यावसायिक अर्शद सिद्धीकी याच्यामार्फत हे पैसे गुंतविल्याचा संशय ईडीला होता. त्यानुसार, ईडीने त्याचा जबाबही नोंदविला होता. सिद्धीकी व भुजबळ यांचा पुतण्या समीर हे डिसेंबर, २०१३ मध्ये कुवेतला गेले होते. कुवेतमध्ये त्यांनी त्या इमारतीचा हक्क असलेल्या राजघराण्यातील व्यक्तींची भेट घेऊन करारावर चर्चा केली होती, असे पुरावे ईडीला मिळाले होते. याबाबत ईडीकडून तपास सुरू आहे. याबाबत संबंधित खरेदीदार कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजाविण्यात आली असल्याची माहिती समजते आहे. हा तपास सुरू असतानाच, शुक्रवारी ही इमारत बेनामी मालमत्ता म्हणून घोषित करत, ती आयकर विभागाने जप्त केली आहे.