आणखी १२ भूखंड पालिकेच्या ताब्यात
By admin | Published: May 26, 2017 03:54 AM2017-05-26T03:54:29+5:302017-05-26T03:54:29+5:30
देखभालीसाठी मुंबईतील विविध खासगी संस्थांना देण्यात आलेले मोकळे भूखंड व उद्यान ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेने पुन्हा एकदा वेग घेतला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देखभालीसाठी मुंबईतील विविध खासगी संस्थांना देण्यात आलेले मोकळे भूखंड व उद्यान ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. आत्तापर्यंत १५६ मैदाने व उद्याने ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यात आता आणखी १२ मोकळ्या जागा पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये माजी आमदार रमेशसिंह ठाकूर यांच्या संस्थेसह प्रजापिता बह्मकुमारी आणि अन्य संस्थांचा समावेश आहे.
मुंबईतील २१६ मनोरंजनासाठीची मैदाने, खेळाची मैदाने ही दत्तक तत्त्वावर संस्थांना चालवण्यास देण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर करण्यात आला. मात्र या धोरणावर आक्षेप घेण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला स्थगिती दिली. त्याचबरोबर ही सर्व मैदाने महापालिकेने ताब्यात घेण्याचे आदेशही दिले. त्यानुसार महापालिकेने टप्प्याटप्प्याने नोटीस बजावून अशी मैदाने आणि उद्यानांची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया
सुरू केली. आतापर्यंत २१६पैकी
१५६ मैदाने आणि उद्याने
महापालिकेने ताब्यात घेतली
आहेत.
मात्र, राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अन्य संस्थांकडे असलेल्या मोकळ्या जागा ताब्यात घेण्यात चालढकल केली जात होती. याबाबत विरोधी पक्षांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यामुळे गेले काही दिवस थंडावलेल्या या प्रक्रियेने पुन्हा वेग घेतला आहे.
कांदिवली, परळ अशा विविध ठिकाणची १२ मैदाने आणि उद्यानांच्या जागा संस्थांकडून ताब्यात घेण्यासाठी नोटीस पाठवल्या. त्यानुसार कांदिवलीमध्ये माजी आमदार रमेशसिंह ठाकूर यांच्या ठाकूर कॉलेज आॅफ सायन्स अॅण्ड कॉमर्स या महाविद्यालयाच्या ताब्यात ठाकूर व्हिलेजमध्ये असलेली दोन खेळांची मैदाने, तसेच त्यांच्याच झगडूसिंह चॅरिटेबल ट्रस्टच्या ताब्यातील दोन मैदानांना नोटीस बजावली. तसेच एफ-दक्षिण विभागातील बह्मकुमारी प्रजापिता संस्थेच्या ताब्यातील दोन असे एकूण १२ संस्थांकडील मोकळे भूखंड ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या भूखंडांवरपण कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन, बोरीवली येथील बिगर शासकीय संस्था सिटी स्पेस, विलेपार्ले येथील रमेश प्रभू यांचे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे मातोश्री सुप्रिमो क्लब, खासदार गोपाळ शेट्टी यांचा पोईसर जिमखाना, कमला विहार स्पोटर््स क्लब, वीर सावरकर उद्यान, झाँसी की रानी उद्यान, विनोद घोसाळकर यांच्या संस्थेकडे असलेले दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवसेनेचे नेते व मंत्री सुभाष देसाई यांच्या संस्थेकडे असलेले गोरेगाव येथील प्रबोधन अशा शिवसेनेच्या नेत्यांकडे असलेल्या नऊ भूखंडांचा समावेश आहे़ भाजपाचे शेट्टी यांनी आपल्या ताब्यातील भूखंड पालिकेला परत करण्याची तयारी दर्शवली होती.
पालिकेच्या नियमांनुसार उद्यान व मैदानाची वेळ, जनतेला विनामूल्य प्रवेश व त्यात भेदभाव नसावा, अशी अट पालिकेने घातली आहे़ त्याचबरोबर उद्यानाच्या प्रवेशद्वारावर जाहिराती फलक लावण्याची मुभा संबंधितांना असेल़
मात्र त्यावर पालिकेचा लोगो असावा़ लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानात जागा राखीव असावी़, कोणतेही बांधकाम करण्यास मज्जाव, भूखंडाचे हस्तांतरण होणार नाही. तिथे राजकीय अथवा अन्य कोणता कार्यक्रम होणार नाही.