ललित टेकचंदानी याची आणखी १३ कोटींची मालमत्ता जप्त- मुंबई व लोणावळा येथे ईडीची छापेमारी
By मनोज गडनीस | Published: February 16, 2024 08:28 PM2024-02-16T20:28:47+5:302024-02-16T20:30:08+5:30
यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई व नवी मुंबई येथे छापेमारी करत ललित टेकचंदानी याची ३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
मुंबई - नवी मुंबईमधील तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पात सर्वसामान्य लोकांची फसवूणक केल्याप्रकरणी विकासक ललित टेकचंदानी याच्याशी संबंधित मुंबई व लोणावळा येथे तीन ठिकाणी छापेमारी करत ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) अधिकाऱ्यांनी १३ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई व नवी मुंबई येथे छापेमारी करत ललित टेकचंदानी याची ३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
या प्रकरणी आतापर्यंत एकूण ४३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याचसोबत साडे सत्तावीस लाखांची रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, ललित टेकचंदानी याच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले होते.
या प्रकल्पात घरे घेऊ इच्छिणाऱ्या १७०० लोकांकडून एकूण ४०० कोटी रुपये जमा केले होते. मात्र या प्रकल्पाला बराच विलंब झाला. तसेच टेकचंदानी याने लोकांना पैसेही परत केले नाही. याउलट या सर्वसामान्य लोकांकडून जमा केलेल्या रकमेचा अपहार करत ती वैयक्तिक लाभासाठी वापरल्याचा ठपका ईडीने त्याच्यावर ठेवला आहे.