मुंबई : मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयात आणखी २२० खाटा उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. संसर्गजन्य आजारांवर उपचार करण्यासाठी या रुग्णालयाला अत्याधुनिक आणि परिपूर्ण सेवांनी सज्ज करण्यात येणार आहे.
मुंबईत कोरोनाच्या संक्रमण काळात सर्व संशयित कोरोना रुग्ण आणि कोरोना रुग्णांना निदान आणि उपचारांकरिता या रुग्णालयात पाठविले जात होते. शिवाय, याच रुग्णालयात पहिल्यांदा कोरोनाच्या निदानासाठी प्रयोगशाळा सुरू कऱण्यात आली. मात्र शहर-उपनगरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आल्यानंतर तात्पुरत्या कोरोना केंद्राची निर्मिती कऱण्यात आली. वरळी येथील एनएससीआय, अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय या वैद्यकीय संस्थांचे कोरोना संसर्ग नियंत्रणात मोठे योगदान आहे.
कस्तुरबा रुग्णालयात तयार करण्यात येणाऱ्या अतिरिक्त खाटांविषयी माहिती देताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, कस्तुरबा रुग्णालयात दोन विभाग सुरू करण्याचा मानस आहे. या रुग्णालयात १३ क्रमांकाच्या विभागात १५० खाटा तयार करण्यात येतील, तर अन्य ७० खाटा रुग्णालय आवारात तयार होणाऱ्या इमारतीत करण्यात येणार आहेत, याकरिता एकूण १५० कोटींची तरतूद कऱण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या पुढील अर्थसंकल्पात निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच, भविष्यात या ठिकाणी संसर्गजन्य आजारांच्या उपचारांकरिता मोठे केंद्र उभारण्यात येईल. त्याचप्रमाणे, कस्तुरबाच्या नव्या इमारतीत व्हेंटिलेटर सुविधाही परिपूर्ण कऱण्यात येणार आहेत.