मुंबई : सांताक्रूझ येथील ३०० वर्षे जुने आफ्रिकन प्रजातीचे गोरखचिंच म्हणून ओळखले जाणारे झाड मेट्रोच्या कामासाठी तोडले गेल्याचे उदाहरण ताजे असताना आता आरे कॉलनीतील या प्रजातीच्या आणखी एका झाडावर संकट आले आहे. या झाडाच्या बुंध्याभोवती काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे हळूहळू या झाडाच्या मुळांना होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी होऊन झाडाचा बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरे कॉलनीजवळील मरोळ मरोशी रोडवरील जेव्हीएलआर पुलाजवळ हे विस्तीर्ण झाड आहे. मरोळ मरोशी रोडचे काँक्रीटीकरण करताना या झाडाच्या बुंध्याभोवतीही काँक्रिटीकरणचा थर देण्यात आला आहे. नागरी कामे करताना कोणते निकष पाळावेत याविषयी राष्ट्रीय हरित लवाद आणि केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट निर्देश आणि मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. नागरी कामे करताना झाडांचे संरक्षण कसे करावे हे त्यात अंतर्भूत आहे. मात्र आरे कॉलनीत ही मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेन्टा यांनी केला आहे. काँक्रिटीकरणामुळे प्राणवायु शोषून घेण्याची या झाडाची क्षमता दिवसेंदिवस कमी होऊन , एक दिवस झाड मारून जाईल. त्यामुळे नैसर्गिक वारसा असणारा एक पुरातन वृक्ष आपण गमावून बसू, असे ते म्हणले.काँक्रीटीकरण करताना झाडांच्या बुंध्यालगतचा काही भाग मोकळा सोडायचा असतो. किमान १ मीटर अंतर ठेवायचे असते. मात्र सगळे नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. झाडाला धक्का ना लावता काँक्रीटीकरण काढून टाकावे आणि भविष्यात असा प्रकार होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी. त्याचबरोबर अशा पद्धतीने काँक्रीटीकरण ज्यांनी केले , त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वीच सांताक्रूझ भागातील गोरख चिंचेचे झाड मेट्रोच्या कामासाठी तोडण्यात आले होते. हे झाड सांताक्रूझचा जेष्ठ नागरिक या नावाने ओळखले जात होते. हे झाड तोडल्यामुळे स्थानिक पर्यावरण प्रेमींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती.