लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दोन दिवस कुटुंबीयांसह लोणावळ्याला फिरून आल्यानंतर एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या विमा विभागात काम करणाऱ्या उपव्यवस्थापकाने सोमवारी अटल सेतूवरून समुद्रात उडी घेतली. घटनास्थळी बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.
सुशांत चक्रवर्ती (४०) असे या बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. ते फोर्ट येथील बँकेत कार्यरत होते. ते पत्नी, सात वर्षांची मुलगी आणि पत्नीच्या आईसह परेल गाव परिसरात राहतात. सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे बँकेत जाण्यासाठी घर सोडले. सीसीटीव्ही फूटेजनुसार सोमवारी सकाळी ते अटल सेतूवर आले. तेथे कर्मचारी दिसल्याने ते पुढे गेले आणि परत आले. सकाळी ९.५७ मिनिटांनी त्यांनी समुद्रात उडी घेतली. गेल्या महिन्यात पुण्यातील कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकाऱ्याने मुंबईतील बैठकीनंतर अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्या केली होती.
पत्नीला मेसेज केला अन्... चक्रवर्ती यांनी समुद्रात उडी घेण्यापूर्वी पत्नीला, “मैं ऑफिस पहुंच गया हूं” असा संदेश पाठवला. त्यानंतर पत्नीनेही त्यांना मुलीच्या शाळेत पालक सभेसाठी आल्याचे सांगितले. मात्र, त्यावर त्यांचा रिप्लाय आला नाही. त्यानंतर, काही वेळाने पोलिसांनीच त्यांच्या पत्नीला या घटनेची माहिती दिली. चक्रवर्ती यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कामाच्या ठिकाणी प्रचंड ताण असल्याने ते तणावाखाली होते. यापूर्वीही ते दोन दिवस घरी आले नव्हते.