आरेच्या जागी आणखी एका बीकेसीचा घाट; पर्यावरणप्रेमींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 01:02 AM2019-09-08T01:02:11+5:302019-09-08T01:02:29+5:30

वृक्षतोडीमुळे साचणार पावसाचे पाणी, २७ आदिवासी पाड्यांचे नुकसान

 Another BKC Place in Aarey Colony | आरेच्या जागी आणखी एका बीकेसीचा घाट; पर्यावरणप्रेमींचा आरोप

आरेच्या जागी आणखी एका बीकेसीचा घाट; पर्यावरणप्रेमींचा आरोप

Next

सागर नेवरेकर 

मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनी ही जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत आहे. आरे वसाहत हे मुंबईचे ‘फुप्फुस’ म्हणून ओळखले जाते. मोर, फुलपाखरू ब्लू मॉरमॉन, राज्य फूल तामण, राज्य पक्षी हरियाल, देशातील सर्वांत मोठा सर्प अजगर, बिबटे, साधारण १० प्रजातींचे कोळी इत्यादी पशुपक्ष्यांचा वावर आरेच्या जैवविविधतेत दिसून येतो. परंतु इतर प्रकल्प येथे आणत आरे कॉलनी नष्ट करून त्या जागी नवीन बीकेसी निर्माण करण्याचा प्रशासनाचा घाट आहे, अशी चर्चा आता पर्यावरणप्रेमींमध्ये होत आहे.

आरेत छोटा काश्मीर, पिकनिक पॉइंट, फुलपाखरू उद्यान आणि सर्वांत जुनी दुधाची डेरी आहे. यांचा विकास करण्याकडे प्रशासनाने अधिक लक्ष दिले पाहिजे. मेट्रो कारशेडसाठी आरेतील २ हजार २३८ झाडांची कत्तल होणार असून वृक्ष प्राधिकरणात बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा पर्याय असताना आरे कॉलनीतील झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे २७ आदिवासी पाड्यांचे नुकसान होणार आहे.

प्रशासनाची मनमानी सुरू
पर्यावरणवादी झोरू बथेना यांनी सांगितले की, मेट्रो प्राधिकरणाची राखीव जागा ही कफ परेडमध्ये आहे. परंतु तिथे झोपडपट्टी वसलेली आहे. प्रशासन झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन न करता किंवा त्यांना तिथून न हटवता; जंगल नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. सीएसटीजवळ पोर्ट ट्रस्ट, महालक्ष्मी रेसकोर्सनजीक, धारावी, बीकेसी, कलिना मुंबई विद्यापीठ इत्यादी ठिकाणची जागा पर्याय म्हणून उपलब्ध असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरेमधील सारीपुतनगर ही जागा शिल्लक होती. मात्र आता तिथे नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. कांजूरमार्गमध्ये सर्वांत मोठी जागा आहे. पर्यावरण कोणाला आपली व्यथा सांगू शकत नाही. कोणाशी भांडू शकत नाही. न्यायासाठी लढू शकत नाही. पक्षी, प्राणी व वनस्पती मोर्चे किंवा आंदोलन करू शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनाची मनमानी सुरू आहे. आरे कॉलनी विकासाच्या नावाखाली ‘बीकेसी २’ची निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

कांजूरमार्गच्या जागेचे प्रकरण अजूनही न्यायालयातच...
कांजूरमार्गच्या जागेत पूर्वी मिठागरांचा व्यवसाय होत असे. शासनाने भाडेतत्त्वावर ही जागा मिठागरे चालवणाऱ्यांना दिली. कालांतराने पूर्व दु्रतगती महामार्ग बांधण्यात आला. त्यानंतर समुद्राचे पाणी मिठागरात येणे बंद झाले. पुढे मिठागराचा व्यवसाय ठप्प झाला. प्रशासनाने ती जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर मिठागरे चालवणाºया माणसांनी जागेसाठी प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. जेव्हा आरे कॉलनीतील समस्या सुटतील, तेव्हाच कांजूरमार्गचीही समस्या सुटेल, असेही भाष्य पर्यावरणप्रेमींनी केले.

वनशक्ती प्रकल्पाचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले की, आरे कॉलनीमधील ३३ हेक्टरच्या जमिनीवरील सुमारे दोन हजार झाडे तोडली जाणार आहेत. याशिवाय रस्त्यावर येणाºया ३०० झाडांवरही कुºहाड बसणार. इतकी झाडे तोडली गेली तर शहराचे तापमान झपाट्याने वाढेल. प्रदूषण वाढेल. आरेतील जमिनीमध्ये तीन मीटरची भरणी टाकल्यामुळे चकाला, सीप्झ आणि जेव्हीएलआर परिसर पावसात पाण्याखाली जाईल.

झाडे धूळ रोखून ठेवतात. परंतु आता सर्व धूळ मनुष्याच्या शरीरात जाणार आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावणार. कांजूरमार्ग येथे मेट्रो ६ चे कारशेड तयार होत आहे. तिथे हा आरेतील मेट्रो कारशेडचा प्रकल्प नेण्यात यावा. आतापर्यंत वृक्षतोड होऊ नये यासाठी ८२ हजार पर्यावरणप्रेमींनी लेखी स्वरूपात विरोध दर्शविला आहे.

Web Title:  Another BKC Place in Aarey Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.