मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतकाँग्रेसला माजी मंत्री मिलिंद देवरांपाठोपाठ आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि मुंबई काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी तसेच त्यांचे वडील व माजी मंत्री बाबा सिद्दिकी लवकरच काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्दिकी पितापुत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात लवकरच प्रवेश करतील. काँग्रेसमध्ये महत्त्व मिळत नसल्याने तसेच महाविकास आघाडी सरकार असताना निधी वाटपात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या कथित अन्यायाच्या पार्श्वभूमीवर सिद्दिकींची नाराजी वाढत गेली होती.
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान झिशान सिद्दिकींच्या मतदार संघात असल्यामुळे त्यांना निधी वाटपात डावलले जात होते, असे बोलले जाते. या संदर्भात त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रारही केली होती. मात्र त्याचा फायदा झाला नव्हता. त्याचवेळी अजित पवार यांनी मात्र त्यावेळी अर्थमंत्री या नात्याने झिशान यांना मदत केल्याचे बोलले जाते. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने सिद्दिकींची नाराजी वाढत गेली व सिद्दिकी पितापुत्रांनी अजित पवारांशी संपर्क सुरू केला.