मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत आमदारांची आणि नेतेमंडळींची गळतीच लागल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीवेळी मराठवाड्यातील हिंगोलीचे नेते आमदार संजय बांगर यांनीही आपला पाठिंबा शिंदेगटाला जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला. तर, दुसरीकडे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राष्ट्रपतीपदासाठी भाजप युतीच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती पत्राद्वारे केली होती. आता, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांना अजूनही शिवसेनेतील नेत्यांची गळती रोखण्यात अपयश येताना दिसत आहे. भावना गवळी यांना लोकसभा सभागृहातील शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन काढण्यात आल्यानंतर त्यांच्याजागी राजन विचारे यांची नियुक्ती शिवसेनेनं केली. त्यामुळे, शिवसेनेतील ही कारवाई चर्चेत असताना आता, आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ शिंदे गटात जातील का? अशा राजकीय चर्चांणा उधाण आलंय. अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत. मात्र, त्यांच्या मुलाने यापूर्वीची शिंदेगटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, गेल्या 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात अडसूळ यांना पराभव पत्करावा लागला होता.