मेट्रो-३ मार्गिकेच्या कामादरम्यान आणखी एका इमारतीला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:16 AM2019-11-22T01:16:13+5:302019-11-22T01:16:20+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाच्या कामादरम्यान इमारतीला तडे जाण्याची आता दुसरी घटना समोर आली आहे
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाच्या कामादरम्यान इमारतीला तडे जाण्याची आता दुसरी घटना समोर आली आहे. भुयारीकरणाच्या कामादरम्यान माहिम येथील मेहेर मंज़िल या इमारतीला तडे गेल्याची बाब समोर आली आहे. यावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आपले स्पष्टीकरण दिले असून या इमारतीची दुरुस्ती करून देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
माहिम पश्चिम येथील मेहेर मंज़िल इमारतीला तडे गेले असल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी तत्काळ एमएमआरसीला कळविले. एमएमआरसीने या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढत या इमारतीला आधार म्हणून टेकू लावण्यात आले. या इमारतीमध्ये बारा रहिवासी राहत होते. आता या रहिवाशांना तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी याच विभागातील लक्ष्मी इमारतीलाही मेट्रो-३ मार्गिकेच्या कामादरम्यान तडे गेले होते.
माहिम येथील ज्या लक्ष्मी बिल्डिंग आणि मेहेर मंज़िल या इमारती मेट्रो-३ स्थानकाच्या बांधकामादरम्यान सातत्याने निरीक्षणाखाली होत्या, त्यांना काही अंशी हानी पोहोचल्याचे निदर्शनास आले असल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे. तसेच ९ नोव्हेंबर २०१९ रोजी शीतलादेवी स्थानक येथे सुरू असलेल्या खोदकामादरम्यान अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे सदर इमारतीलाही अंशत: हानी पोहोचली होती. यावर तत्काळ उपाययोजना म्हणून कंत्राटदाराद्वारे ग्राउटिंग आणि काँक्रिट ब्लॉकचे बांधकाम करण्यात आले असल्याचे एमएमआरसीचे म्हणणे आहे. यासह २०१७ सालामध्ये केलेल्या इमारत सर्वेक्षणानुसार सदर इमारतीची नोंद मध्यम धोकादायक म्हणून करण्यात आली होती. या इमारती आता रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांचे नियमाप्रमाणे पुनर्सर्वेक्षण करून डागडुजी करण्यात येणार आहे. आतापर्यंत या दोन इमारती वगळता कुठल्या अन्य इमारतीवर परिणाम झाला नसल्याचे आढळले असून शीतलादेवीसह सर्व बांधकाम स्थळांच्या परिसरातील इमारतींच्या सुरक्षेसाठी एमएमआरसीद्वारे सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने अधिकृत केलेल्या संरचनात्मक अभियांत्रिकी सल्लागार संस्थेचा समावेश असलेल्या टीमद्वारे केलेल्या संरचनात्मक लेखापरीक्षणानुसार असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, काही दुरुस्ती करून इमारतींना पूर्वपदावर आणता येऊ शकते. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर या इमारती रहिवाशांकडे सुपुर्द केल्या जातील़