नीरव मोदीला ईडीचा आणखी एक दणका; २५३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, आजवर एकूण २,६५० कोटींची जप्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 05:49 AM2022-07-23T05:49:04+5:302022-07-23T05:49:47+5:30
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये हिरे, दागिने आणि बँकेतील काही रकमेचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला शुक्रवारी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) आणखी एक दणका देत त्याची हाँगकाँगमधील २५३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने शुक्रवारी केलेल्या या जप्तीच्या कारवाईनंतर आता मोदी याची एकूण २,६५० कोटी ७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त झालेली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये हिरे, दागिने आणि बँकेतील काही रकमेचा समावेश आहे.
नीरव मोदीवर २०१८ मध्ये सर्वप्रथम सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास करताना हाँगकाँग येथे नीरव मोदी याची काही मालमत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉड्रिंगप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करत शुक्रवारी त्याची हाँगकाँग येथील मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये काही लॉकर्समधे पडून असलेले हिरे, दागिने यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे, तर बँकांत असलेल्या रोखीच्या रकमेचादेखील समावेश आहे.
मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ईडी ६,४९८ कोटी २० लाख रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करत आहे, तर ७,५०२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे. मोदी याची आजवर एकूण २,६५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली आहे, तर त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची मिळून एकूण सुमारे ४,४०० कोटी रुपयांची मालमत्ता आजवर ईडी, प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली आहे. जप्त झालेल्या काही मालमत्तांचा लिलाव देखील ईडीने यापूर्वी केला असून, यातून १ हजार कोटी रुपये प्राप्त झाले. प्राप्त झालेली रक्कम पंजाब नॅशनल बँकेला वसुलीपोटी देण्यात आलेली आहे, तर अन्य मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे.
नीरव मोदी कुठे आहे?
मे २०१८ मध्ये घोटाळा उघड झाल्यानंतर सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणा मागे लागल्याची कुणकुण त्याला लागली आणि त्याने सर्वप्रथम हाँगकाँग येथे पलायन केले. त्यानंतर जूनमध्ये तो लंडन येथे असल्याचे दिसून आला. तेथील पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर तेथील न्यायालयामध्ये केस सुरू आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. भारतीय तपास यंत्रणांना त्याचा ताबा हवा असून, यासंदर्भात प्रत्यार्पण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
मोदी याच्या आजवर जप्त झालेल्या मालमत्ता
- मोदी याने केलेल्या घोटाळ्यानंतर ईडीने त्याच्या भारतातील अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.
- यामधे वरळी येथील समुद्र महाल या आलिशान बिल्डिंगमधील सुमारे ११० कोटी रुपये किमतीचे तीन फ्लॅट्स जप्त झाले आहेत.
- ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळील फ्लॅट.
- अलिबाग : एक आलिशान बंगला.
- राजस्थान सौर ऊर्जा प्रकल्प, पवनचक्की.
- वरळी : समुद्र महाल या आलिशान बिल्डिंगमधील सुमारे ११० कोटी रुपये किमतीचे तीन फ्लॅट्स. ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळील एक फ्लॅट.
- २० कोटींची पाच घड्याळे.
- २४ लाख रुपये किमतीच्या दोन हँडबॅग.
- डेकोरेट केलेली २२ लाख ३८ हजार कोटी रुपयांची एक ॲम्बेसिडर गाडी
- कोट्यवधी रुपयांची पेन्टिंग्ज.