Join us

आणखी एका उमेदवाराला अटक

By admin | Published: May 19, 2017 3:31 AM

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवारावरील कारवाईपाठोपाठ भांडुपमधूनही एका उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. गणेश शंकर राणे (२५) असे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवारावरील कारवाईपाठोपाठ भांडुपमधूनही एका उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. गणेश शंकर राणे (२५) असे अटक उमेदवाराचे नाव असून त्याने ट्रान्समीटरला इअरफोनची जोड देत लबाडी करण्याचा प्रयत्न केला. पदवीधर असलेला राणे हा वरळीचा रहिवासी आहे. भांडुप पश्चिमेकडील पराग विद्यालय केंद्रातील वर्ग क्रमांक १० मध्ये तो लेखी परीक्षा देत होता. भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केदारे यांना या केंद्रावर दक्षता अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. परीक्षेदरम्यान राणेच्या संशयास्पद हालचालींकडे केदारेंचे लक्ष गेले. तो सतत गालावर हात लावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत भांडुप पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनावणे आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गिजे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचासमक्ष राणेची झडती घेतली. तेव्हा राणेने शर्टाच्या आतील बनियनमध्ये एक पांढऱ्या रंगाचे मशिन लपविल्याचे आढळून आले. त्या मशिनची तार बनियनच्या शिलाईतून गळ्यापर्यंत शिवण्यात आली होती. त्याला एक इअरफोन जोडला होता. त्यामध्ये मायक्रोसिम अ‍ॅडॉप्टरमध्ये सिमकार्ड घालून तो इअरफोनच्या माध्यमातून तो परीक्षेची उत्तरे मिळवत असल्याचे समोर आले. त्याने यामध्ये ट्रान्समीटरचा वापर केला होता. त्याच्या या अनोख्या शकलीमुळे पोलीसही चक्रावले. भांडुप पोलिसांनी त्याला पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तो कोणासोबत बोलत होता? यामागे आणखीन कुणाचा सहभाग आहे? याचा तपास भांडुप पोलीस घेत आहेत. मात्र भांडुप पोलिसांच्या सतर्कतेमुळे या उमेदवाराचा प्रताप उघडकीस आला.