एमबीबीएस प्रवेश फसवणूकप्रकरणी मुंबईत आणखीन एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:04 AM2020-12-28T04:04:22+5:302020-12-28T04:04:22+5:30
माहीम पोलिसांकड़ून तपास सुरु एमबीबीएस प्रवेश फसवणूकप्रकरणी मुंबईत आणखीन एक गुन्हा माहीम पोलिसांकड़ून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
माहीम पोलिसांकड़ून तपास सुरु
एमबीबीएस प्रवेश फसवणूकप्रकरणी मुंबईत आणखीन एक गुन्हा
माहीम पोलिसांकड़ून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतल्या नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक प्रकरणाचा तपास सुरू असताना माहीम पोलिसात अशाच प्रकारे फसवणूक केल्याप्रकरणी आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे.
माहीम परिसरात राहणारे रियाज हाजी (६१) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलीने बीएचएमएस केले असून एका खासजी दवाखान्यात काम करते. मुलीला एमबीबीएस पदवी मिळवायची असल्याने ती मुंबईतल्या विद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करत होती. अशातच नामांकित इंग्रजी दैनिकात एमबीबीएसचे अॅडमिशन करून देण्याची जाहिरात वाचली. त्यावर विश्वास ठेवून संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी त्यांना दुसऱ्या दिवशी माहीम स्थानकाजवळ भेटायला बोलावले. दोघेही ऑडी कारमधून तेथे आले. आरोपींचे उच्च राहणीमान पाहून त्यांना विश्वास बसला. निखिल निरंजन छंगानी आणि त्याचा साथीदार जुगल यांनी नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकूण ८ लाख रुपये देण्यास सांगितले. तसेच अॅडमिशनचे काम न झाल्यास तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार असेही सांगितले. त्यानुसार त्यांनी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ठगाला एकूण ८ लाख रुपये दिले. पैसे देऊनही प्रवेश मिळत नसल्याने त्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती घेतली. त्यावरील निवड यादीत मुलीचे नाव नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पैसे परत करण्यास तगादा लावला. पण ठगांनी कॉल घेणे बंद करताच, त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार शुक्रवारी माहीम पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
....
जोगेश्वरीत दुकलीला अटक
एमबीबीएस प्रवेशाच्या नावाने फसवल्याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी एका दुकलीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या दुकलीकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.
...