Join us  

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 5:21 PM

दहिसमध्ये अज्ञात भरधाव कारच्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Dahisar Hit And Run : मुंबईत आणखी एका हिट अँड रन प्रकरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील दहिसर येथे भरधाव कारने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान, त्याची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी कार चालकाचा शोध सुरू केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत भरधाव कारमुळे अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहे. या अपघातात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतोय. अशातच शुक्रवारी दहिसर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी दहिसरहून कांदिवलीच्या दिशेने दोन मित्र बाईकवरून जात असताना घडली. मागून भरधाव येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातात बाईक चालक करण राजपूत गंभीर जखमी झाला, तर मागे बसलेल्या आदित्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी करण राजपूत (१८) हा त्याचा मित्र आदित्यसोबत दहिसरहून कांदिवलीच्या दिशेने दुचाकीने जात होता. त्याचा तिसरा मित्र पियुष शुक्ला हाही त्याच्यासोबत दुचाकी चालवत होता. हे तिघे शैलेंद्र हायस्कूल पुलाखालून येताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने करण राजपूतच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे करण व आदित्य दोघेही गंभीर जखमी झाले. पाठीमागे बसलेल्या आदित्यला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला, तर करण गंभीर जखमी झाला.

शैलेंद्र हायस्कूलजवळून परतत असताना पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली दहिसर पूर्व येथे ओव्हरटेक करत अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.  करण डाव्या बाजूला पडला आणि आदित्य उजव्या बाजूला पडला. आदित्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या कान व नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. घटनेनंतर कार चालकाने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. करण राजपूत आणि पियुष शुक्ला कसेतरी ऑटोरिक्षाने कांदिवलीतील सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तर उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४(अ), १३४(ब), १८४ आणि भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) आणि २८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कार चालकाचा शोध सुरू आहे. अनोळखी कार चालकाची ओळख पटवण्यासाठी पोलीस अपघात स्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत असून त्याच्या शोधासाठी एक टीमही तयार केली आहे.

टॅग्स :मुंबईअपघातमुंबई पोलीस