अलिबाग :अलिबागमधील एका तरुणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवलेल्या बंटी आणि बबलीने तालुक्यातील अजून एकाला सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून सात लाख घेतल्याबद्दल मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात धनश्री तावरे आणि संजय सावंत या दोघांना अटक केले असून १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. अलिबाग तालुक्यातील अनेक जण या बबलीच्या जाळ्यात अडकले आहेत मात्र समाजातील इज्जतीमुळे गुन्हा दाखल करण्यास पुढे येत नाही आहेत. त्यामुळे नक्की या हनी ट्रॅप मधून आरोपींनी किती कमाई केली याचा अंदाज लागत नाही आहे.
अलिबाग तालुक्यातील परहुर येथील फिर्यादी आणि धनश्री तावरे यांचे १३ जानेवारी २०२३ रोजी नवखार येथे एका कॉटेजवर शारीरिक संबंध आले होते. त्यानंतर आरोपी सावंत याने फिर्यादी यास मोबाईल वर फोन करून नवखार येथील कॉटेज येथे झालेले शारीरिक संबधाची माहीती तिचे पती व नातेवाईक यांना मिळाल्याने ते मारण्याकरीता निघालेले आहेत. असे फिर्यादी यांस सागुन सदरचे प्रकरण मिटवण्याकरीता आरोपी यांनी सगंणमत करून १० लाख रूपयाची खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केली. अखेर तडजोड अंती फिर्यादी यांच्याकडून १६ जानेवारी रोजी ७ लाख रुपये खंडणी घेतली. तसेच फिर्यादी यांचे मोबाईल मधुन व्हॉटसअप चॅट, तसेच गॅलरीतील फोटो डिलीट करून पुरावा नष्ट केला.
अलिबाग मधील आगर सुरे येथील तरुणाला हनी ट्रॅप मध्ये फसविल्याबाबत गुन्हा मांडवा पोलीस ठाण्यात दाखल होऊन आरोपींना अटक केल्याची माहिती परहूर येथील फिर्यादीस समजल्यावर त्याने पोलिसांना आपल्या बाबत घडलेला वृत्तान्त सांगितला. त्यानुसार मांडवा पोलिसांनी तावरे आणि सावंत यांना १४ फेब्रुवारी रोजी अटक करून गुन्हा दखल केला. दोघानाही अलिबाग न्यायलायात हजर केले असता न्यायालयाने १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०/२०२३ भा.दं.वि.क. ३८४ , २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास चेतन म्हात्रे हे करीत आहेत.