आणखी दिलासा... शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 04:36 PM2022-01-21T16:36:37+5:302022-01-21T16:37:11+5:30
त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या नियमावलीला अनुसरून वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय
मुंबई : राज्यात सोमवार दि. 24 जानेवारी पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करावीत तसेच यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत.
विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोविड विषयक नियमांचे पालन करुन पून्हा सुरु करण्याबाबत विभागाला आदेशित करण्यात आले आहे. ( 2/3 )
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 21, 2022
राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी कोविडची परिस्थिती आटोक्यात येत असून, सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये व निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत, त्या-त्या स्थानिक प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने स्थानिक नियमावलीला अनुसरून व आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.