Join us

युनानी डॉक्टर राजस्थानच्या टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा

By मनीषा म्हात्रे | Published: November 30, 2023 6:14 PM

माटुंगा येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचा संधीवाताच्या उपचाराच्या नावाखाली आरोपींनी साडे सात लाख रुपयांची फसवणूक केली होती.

मुंबई : युनानी डॉक्टर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या राजस्थानच्या टोळीला नव्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखीन ९ तक्रारदार समोर आले असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

माटुंगा येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचा संधीवाताच्या उपचाराच्या नावाखाली आरोपींनी साडे सात लाख रुपयांची फसवणूक केली होती. महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सर्व आरोपींना बुधवारी गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पोलिसांनी अटक केली.गुन्हे शाखेने राजस्थानच्या मोहम्मद शेरु शेख मकसुद खॉ उर्फ डॉ. आर. पटेल (४९), मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ (३९), मोहम्मद आसिफ मोह. निसार (२७)  व मोहम्मद अशिफ मोह. शरीफ (४४) या आरोपीना अटक केली आहे.

युनानी डॉक्टर असल्याचे भासवून ही टोळी उपचाराच्या बहाण्याने फसवणूक करत होती. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने टोळीचा पर्दाफाश करत त्यांना अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत ९ जणांना अशाप्रकारे गंडविल्याचे समोर आले आहे. आरोपींची व्हॉट्सअॅपवरील संभाषण व दूरध्वनीच्या माहितीवरून आणखी तक्रारदारांची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. अटक आरोपींपैकी मोहम्मद शेरू हाच सर्व तक्रारदारांच्या घरी डॉक्टर पटेल बनून गेला होता.  या टोळीने वडाळा येथील रहिवासी असलेले राजेश पाटील यांची साडे चौदा लाख रुपयांची, मायरोस सालियन यांची २७ लाख रुपये, गेव मेस्त्री यांची १७ लाख रुपयांची, फिरोज सिंदवा यांची आठ लाख ५० हजार रुपये, आलिन मेहता यांची १० लाख, अरुण मेहता यांची तीन लाख २० हजार रुपये, महावीर जैन यांची एक लाख ६१ हजार रुपये, सुषमा वारोट यांची ९ लाख ४० हजार रुपये व प्रकाश नाईक यांची आठ लाख रुपयांची अशी एकूण एक कोटी रुपयांची या टोळीने गंडविले आहे.

टॅग्स :मुंबई