विकासक अग्रवालवर आणखीन एक गुन्हा
By admin | Published: September 13, 2016 03:14 AM2016-09-13T03:14:12+5:302016-09-13T03:14:12+5:30
आॅर्बिट हाइट्स बांधकाम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक पुजित अग्रवाल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत
मुंबई : आॅर्बिट हाइट्स बांधकाम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक पुजित अग्रवाल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अग्रवाल यांच्यासह आठ जणांविरोधात डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना या गुन्ह्यांतही लवकरच अटक होण्याची शक्यता डी.बी. मार्ग पोलिसांनी वर्तवली आहे. अग्रवाल यांना नुकतीच आझाद मैदान पोलिसांनी अटक केली होती.
गावदेवी परिसरातील गोवालीया टँक इमारतीमध्ये कुटुंबासह राहत असलेल्या मीना जैन (५२) यांच्या पतीच्या नावावर येथील नाना चैकातील इराणी चाळीत खोली होती. जागा मालक प्रदीप गोरागांधी यांनी २००४ साली या ठिकाणी पुनर्विकासाचा प्रकल्प आणला. हा प्रकल्प पुजित अग्रवाल यांच्या मालकीच्या आॅर्बिट हाइट्स या बांधकाम कंपनीला देण्यात आला होता. अग्रवाल यांनी नवीन इमारतीमध्ये ६७५ चौ. फुटांचा फ्लॅट क्रमांक ६०४ देण्यात येईल, असे जैन कुटुंबीयांना सांगितले. जैन कुटुंबीयांनी कायदेशीर कराराची प्रक्रिया पूर्ण केली. इमारतीचे बांधकाम पूर्ण होत असताना २००९-१० मध्ये फ्लॅट क्रमांक ६०४ ऐवजी फ्लॅट क्रमांक २१०३ देत असल्याचे सांगून अग्रवाल यांनी जैन कुटुंबीयांची सहमती घेत त्यांच्याशी नवीन करार केला.
नवीन घर मिळणार या आनंदात जैन कुटुंब होते. याच काळात अग्रवालच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेले १४ हजारांचे वीज बिल, १ लाख ३४ हजारांचा मेन्टेनन्स आणि गॅस जोडणीचे ६ हजार रुपये जैन कुटुंबाने भरले. मात्र अद्यापही फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने जैन कुटुंबीयांनी चौकशी केली असता अग्रवालने २१०३ हा फ्लॅट हितेश संघवी नावाच्या व्यक्तीला विकल्याची माहिती त्यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मीना जैन यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली. गावदेवी पोलिसांनी या प्रकरणी बिल्डर पुजित अग्रवालसह आठ जणांविरोधात १९ डिसेंबर २०१५ रोजी गावदेवी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हा गुन्हा डी. बी. मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)