मुंबई - राज्यातील नामवंत आणि मोठ्या ग्रंथांचा संग्रह असलेल्या मुंबईमराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी बाजी मारली. त्यामुळे, आणखी एक निवडणूक जिंकण्याचा मान पवार यांना मिळाला आहे. पवार यांच्याविरोधात ग्रंथालय बचाव समितीचे धनंजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती.
शरद पवार आणि धनंजय शिंदे यांच्यात झालेल्या ग्रंथालयाच्या अध्यक्षपदासाठी एकूण 31 जणांनी मतदान केलं. त्यामध्ये, शरद पवार यांना 29 मतं मिळाली असून विरोधी शिंदे यांना केवळ 2 मतं मिळाली आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती, धनंजय शिंदेंनी निवडणुकांपूर्वी शरद पवार यांच्याविरोधात अनेक आरोप केले होते. मात्र, तरीही मतदारांनी पवार यांच्याबाजुनेच एकतर्फी कौल दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, वास्तुविशादर शशी प्रभू, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद सावंत, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर तसंच प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर हे सात जण निवडून आले आहेत. उपाध्यक्षपदाच्या सात जागांसाठी १४ उमेदवार होते. संतोष कदम, डॉ. रजनी जाधव, आनंद प्रभू, प्रमोद खानोलकर, झुंजार पाटील, डॉ. संजय भिडे, सुधीर सावंत हे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्पर्धेत होते.