मल्ल्याला फरारी घोषित करण्यास आणखी मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 05:35 PM2018-09-03T17:35:45+5:302018-09-03T17:36:31+5:30
सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मल्ल्याला उत्तर देण्यास 3 आठवड्यांचा कालावधी दिला आहे.
नवी दिल्ली : देशातील बँकांना दहा हजार कोटींना चुना लावून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याला मुंबईतील एका न्यायालयाने फरारी घोषित करण्यास नकार दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मल्ल्याला उत्तर देण्यास 3 आठवड्यांचा कालावधी दिला आहे. मल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी याचिकेत केली होती. यावर मल्याने काही वेळ देण्याची मागणी केली होती.
मल्ल्याला 24 सप्टेंबरमपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. यानंतर न्यायालय पुढील सुनावणीवर निर्णय घेणार आहे. यापूर्वी 27 ऑगस्टच्या सुनावणीवेळी 3 सप्टेंबरची तारीख देण्यात आली होती. तर याच न्यायालयाने मल्ल्याला 30 जूनला हजर राहण्याचा आदेश दिला होता.
कर्जामध्ये डुबलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्यावर आरोप आहे की, त्याने देशातील बँकांकडून तब्बल 9990 कोटींचे कर्ज घेऊन फरार झाला आहे. सध्या तो लंडनमध्ये आहे. तेथे त्याच्याविरोधात प्रत्यार्पण करण्यासाठी खटला चालू आहे.
आर्थिक गुन्हेगार कोण?
नव्या अधिनियमानुसार ज्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले जाते, त्याची संपत्ती त्वरित जप्त केली जाते. तसेच त्याच्याविरोधात गुन्हयांवरून अटक वॉरंट काढला जातो. असा व्यक्ती जो कारवाईपासून वाचण्यासाठी परदेशात पळून गेला असेल, किंवा परदेशात वास्तव्यास असेल. या अध्यादेशामध्ये 100 कोटींपेक्षा जास्तीचे फसवणुकीचे गुन्हे येतात.