Join us

अकरावी प्रवेशासाठी आणखी एका अतिरिक्त फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:09 AM

शिक्षण संचलनालय : प्रवेश निश्चितीची शेवटची तारीख १३ फेब्रुवारीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, ...

शिक्षण संचलनालय : प्रवेश निश्चितीची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या राज्यांच्या सहा विभागांतील अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत नियमित फेऱ्या, विशेषफेऱ्या आणि एफसीएफएस (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. मात्र काही विद्यार्थी अद्यापही प्रवेशाविना असल्याने त्यांना प्रवेशाची अतिरिक्त संधी देण्यासाठी एफसीएफएस फेरीचे आयोजन करण्याच्या सूचना शिक्षण संचलनालयाने दिल्या आहेत. १३ फेब्रुवारी ही अकरावी प्रवेशाची शेवटची तारीख असेल.

शिक्षण संचलनालयाच्या माहितीवरून राज्यात सहा विभागांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत १ लाख ८५ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त एफसीएफएस फेरीमध्ये एटीकेटीसह दहावी उत्तीर्ण असलेले सर्व विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतील. ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या फेरीदरम्यान विद्यार्थी आपले आधीचे प्रवेश रद्द करायचे असल्यास ते करून नव्याने अर्ज करू शकतील. त्यानंतर त्यांची छाननी करून ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान एफसीएफएस प्रक्रियेद्वारे त्यांना अलॉटमेंट मिळालेल्या जागांवर ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या बटणावर क्लिक करून प्रवेश निश्चित करू शकतील. या प्रवेशदरम्यान बायफोकल व कोटा प्रवेश सुरू राहतील.

१३ फेब्रुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश अकरावी प्रक्रियेमध्ये निश्चित करण्याची संधी मिळेल. १४ फेब्रुवारी रोजी अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या २०२०-२१ मधील रिक्त जागांची स्थिती व अंतिम अहवाल सादर केला जाईल, अशी महिती शिक्षण संचलनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

* राज्यातील अकरावी प्रवेशाची स्थिती (कंसातील आकडेवारी टक्क्यांमध्ये)

विभाग-प्रवेश क्षमता-अर्ज केलेले विद्यार्थी-प्रवेशित विद्यार्थी-रिक्त जागा-प्रवेश न घेतलेले विद्यार्थी

पुणे - १०७०९०- ८६९१२-७०२१९(८०. ७८ )- ३६८७१(३४. ४४ )- १६६९२(१९. २१ )

मुंबई - ३२०३९०- २५८८५५- २१८१६०(८४. २८)- १०२२३०(३१. ९१)- ४०६९५(१५. ७२)

अमरावती - १५३६०- १३२२१- १०८६०(८२. १४)- ४५००(२९. ३)- २३६१(१७. ८६)

औरंगाबाद - ३१४७०- २१६२०- १६६२०(७६. ८७)- १४८५०(४७. १९)- ५०००(२३. १३)

नागपूर - ५९२५०- ३९१८८- ३४४७४(८७. ९७)- २४७७६(४१. ८२)- ४७१४(१२. ३)

नाशिक- २५२७०- २६८२२- १९५०१(७२. ७१)- ५७६९(२२. ८३)- ७३२१(२७. २९)

एकूण - ५,५८, ८३०- ४, ४६, ६१७- ३६९८३४(८२. ८१)- १८८९९६(३३. ८२)- ७६७८३(१७. १९)

.................