मुंबई/नागपूर : काही दिवसांपूर्वी उत्तरेकडे सरकलेला मान्सून पुन्हा दक्षिणेकडे सरकत असल्याने विदर्भासह महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय झाला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तर मुंबई, काेकणासह विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मराठवाड्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत शनिवारी पावसाची रिपरिप सुरू हाेती. तर गडचिराेलीला पुन्हा पावसाने तडाखा दिला आहे. गडचिराेली शहरात शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासात तब्बल १२९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. शनिवारी दिवसभरही गडचिराेलीला पावसाने झाेडपले. गाेंदियामध्ये शनिवारी दिवसभरात १९ मि.मी. तर नागपुरात १८.९ मि. मी. पावसाची नाेंद झाली. चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस झाला असून अकाेला व वाशिम जिल्ह्यातही रिपरिप सुरू आहे.