मुंबई - महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला पळवण्यात येत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतरही, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका शिवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यावनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील हिरे उद्योगावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजपा सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या सुपिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनीही महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील हिरे उद्योग आता पुर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले उद्योग धोरण कुठे चुकतेय यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात आहे, ही खेदाची बाब आहे, असे ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय. सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट प्रहार केलाय. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करुन मुंबईतील हिरे उद्योग सुरतला स्थलांतरीत होत असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही टीका केली असून, मागील दीड वर्षात राज्यातील भाजपा सरकार दिल्लीच्या आदेशानुसार महाराष्ट्राची लूट करत आहे. सुरतमध्ये मोठा हिरे उद्योग उभा केला जात आहे, त्यासाठी मुंबईतील हिरे उद्योगही सुरतला नेण्यासाठी तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही मार्गी लागावे यासाठी पंतप्रधान मोदी आले आहेत, असे पटोले यांनी म्हटले. तसेच, बुलेट ट्रेन प्रकल्प हा महाराष्ट्रावर मोठे ओझे आहे पण मोदी-शहा समोर शिंदे-फडणवीस-पवार काहीच बोलू शकत नाहीत. मुंबई व महाराष्ट्रातील उद्योग, महत्वाची कार्यालये, संस्था मुंबई, महाराष्ट्राबाहेर घेऊन जाण्याचे सपाटा भाजपाने लावलेला आहे. राज्याला रसातळला घालवण्याचे पाप भाजपा सरकार करत आहे.