स्नेहा पावसकर, ठाणेठाणे कौटुंबिक न्यायालयात दरवर्षी निकाल लागणाऱ्या प्रकरणांपेक्षा नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्याच अधिक असते. परिणामी, प्रलंबित खटल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ही प्रकरणे वेळीच मार्गी लागून त्यांची संख्या कमी होण्यासाठी आणखी एका न्यायाधीशाची गरज असून तसा प्रस्ताव शासनदरबारी पाठवण्यात आला असून तो चार वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ठाणे कौटुंबिक न्यायालयात २०१२ च्या वर्षअखेरीस एकूण १३२५ प्रकरणे प्रलंबित होती. तर २०१३ मध्ये ९४१ नवीन प्रकरणे दाखल झाली. यापैकी ८५९ निकाली काढण्यात आली. त्यामुळे २०१३ च्या वर्षअखेरीस प्रलंबित खटल्यांमध्ये वाढ होऊन ती १४०७ इतकी झाली आहे. या वर्षी नव्याने दाखल झालेल्या प्रकरणांचीही यात भर पडणार असल्याने या वर्षीही यात भर पडण्याची शक्यता आहे. रखडलेल्या खटल्यांची संख्या मोठी असल्यामुळे प्रत्येक दिवशी जास्तीतजास्त प्रकरणे निकाली लावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेकदा विविध कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलली जाते. यामध्ये खूप वेळ वाया जात असल्याने प्रलंबित खटल्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. प्रलंबित प्रकरणांचा खच कमी होऊन नवीन प्रकरणांच्या निकालासाठी वेळ मिळावा, या उद्देशाने कौटुंबिक न्यायालयाला आणखी एका न्यायाधीशाची प्रामुख्याने गरज असल्याचे ठाणे कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक बी.बी. बागल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कौटुंबिक न्यायालयास हवा आणखी एक न्यायाधीश
By admin | Published: July 17, 2014 1:27 AM