माजिवडा नाक्याजवळ उभे राहतेय ११७७ बेडचे आणखी एक कोवीड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 06:49 PM2020-09-15T18:49:46+5:302020-09-15T18:50:41+5:30
कोवीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाण्यात आता आणखी एक ११७७ बेडचे कोवीड सेंटर उभारण्यात आले असून लवकरच ते ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या ठिकाणी ९८१ आॅक्सीजनचे आणि १९६ आयसीयुचे बेड उपलब्ध असणार आहेत.
ठाणे : कोरोनाची वाढती संख्या नजरेसमोर ठेवून पालिकेच्या माध्यमातून कळवा आणि मुंब्य्रापाठोपाठ वागळे इस्टेट भागातही कोवीड सेंटर सुरु केले आहे. परंतु रुग्णांना बेडची कमतरता भासू नये या उद्देशाने माजिवडा येथील पार्कींग प्लाझाच्या ठिकाणी ११७७ बेडचे कोवीड सेंटर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी १९६ बेड हे आयसीयुचे असणार आहेत. या रुग्णालयाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून ते येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या सेवेत रुजु होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात आणखी पाच कोवीड सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. त्या पैकी वागळे येथील कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर आता माजिवडा येथील कोवीड सेंटर येत्या काही दिवसात सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे. या कामाची निविदा काढण्यात आली आहे, त्यानुसार आवश्यक ते मनुष्यबळ आणि डॉक्टर आणि इतर स्टॉफ येथे दिला जाणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत ३० हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. त्यातील २६ हजार १०१ रुग्ण बरे झाले असून ३ हजार ५९९ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ९०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. जुलैच्या अखेर पासून आॅगस्ट पर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांना बेडची कमतरता भासू नये, रुग्णांचा उपचार मिळाले नाही, म्हणून मृत्यु ओढावू नये या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात कोवीड सेंटर उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी साकेत येथील १ हजार आणि कळवा, मुंब्य्रातील १ हजार बेडचे रुग्णालय सेवेत दाखल झाले आहे. त्यानंतर सोमवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वागळे इस्टेट भागातील कोवीड सेंटरचा शुभारंभ करण्यात आला आहे.
परंतु सप्टेंबरमध्ये अपेक्षेनुसार शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. रोज शहरात ४०० ते ५०० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्याच्या कोवीड रुग्णालयांवर ताण वाढू नये म्हणून पालिकेने आता माजिवाडा येथील पुर्व दु्रतगती महामार्गालगतच्या पार्कींग प्लाझाच्या ठिकाणी ११७७ बेडचे नवे कोवीड रु ग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेसाठी सज्ज असून आता विविध कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या कामासाठी २० कोटी ८४ लाख ८ हजार रु पये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पार्कींग प्लाझाच्या पहिल्या मजल्यावर १९६ आयसीयु कक्ष, तर दुसरा, तिसरा आणि चौथ्या मजल्यावर प्रत्येकी ३२७ याप्रमाणे ९८१ आॅक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.