कोस्टल रोडची आणखी एक वाहिनी जुलै अखेरपर्यंत होणार वाहतुकीसाठी खुली

By जयंत होवाळ | Published: June 14, 2024 06:57 PM2024-06-14T18:57:17+5:302024-06-14T18:58:48+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली.

another lane of the coastal road will be open for traffic by the end of july | कोस्टल रोडची आणखी एक वाहिनी जुलै अखेरपर्यंत होणार वाहतुकीसाठी खुली

कोस्टल रोडची आणखी एक वाहिनी जुलै अखेरपर्यंत होणार वाहतुकीसाठी खुली

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोस्टल रोड प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन वाहिन्या तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी एक वाहिनी जुलै २०२४ अखेर पूर्ण करुन त्या वाहिनीवरुन दक्षिण मुंबईकडे येणारी तसेच उत्तरेकडे जाणारी वाहतूक खुली होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी त्यांनी मरीन ड्राइव्हपासून उत्तरेला जाणाऱया मार्गावरील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेतला. यावेळी आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन वाहिन्या तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी एक वाहिनी जुलै २०२४ अखेर पूर्ण करुन त्या वाहिनीवरुन दक्षिण मुंबईकडे येणारी तसेच उत्तरेकडे जाणारी वाहतूक खुली करण्याचे नियोजन करा, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू समुद्रात एकमेकांना जेथे सांधले जातात तेथील दोन खांब्यांमधील अंतर ६० मीटरवरून १२० मीटरपर्यंत नेण्यात आले. कोळी बांधवांची गैरसोय टळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भविष्यात मासेमारी करताना कोळी बांधवांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत होईल . तसेच ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषणातही घट होण्यास मदत होईल आहे. यासह पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील पालिका आणि मुंबई पोलिस यांचे प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पावसाळ्यात मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी देखील विविध पातळीवर पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी चालवला रोडरोलर

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: रोडरोलर चालवून प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱया कामगारांचे मनोबल वाढविले.

Web Title: another lane of the coastal road will be open for traffic by the end of july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.