'दुसरा 'लॉकडाऊन' हा उपाय नाही, महाराष्ट्रातच सातत्याने का वाढतोय कोरोना?'
By महेश गलांडे | Published: February 23, 2021 08:22 PM2021-02-23T20:22:34+5:302021-02-23T20:23:28+5:30
देवेंद्र फडणवीस सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाचा प्रचार करत आहेत. यावेळी, येथील पत्रकारांनी फडणवीस यांना सीबीआय, आंदोलन आणि महाराष्ट्रातील कोरोनासंदर्भात प्रश्न विचारले
मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी रात्री समाज माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी होईल अशा सर्व धार्मिक, राजकीय-सामाजिक कार्यक्रम, यात्रांवर बंदी घालणार असल्याचे सांगितले. तसेच, पुढील आठवडाभर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, पाळली जाणारी शिस्त याचा आढावा घेऊन राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
देवेंद्र फडणवीस सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाचा प्रचार करत आहेत. यावेळी, येथील पत्रकारांनी फडणवीस यांना सीबीआय, आंदोलन आणि महाराष्ट्रातील कोरोनासंदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी, कोरोनाचे नियम सर्वांनीच पाळायला हवेत, असे ते म्हणाले. 'कोरोनाविरुद्ध आपल्या सर्वांनाच लढाई लढायची आहे. पण, महाराष्ट्रातच कोरोना सातत्याने का वाढतोय, याचीही विचार सरकारने करायला हवा. यापूर्वीही महाराष्ट्रातच सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले, सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रातच झाल्या आहेत. आता, कोरोनाची दुसरी लाटही महाराष्ट्रातच जाणवत आहे. त्यामुळे, कोरोनाला रोखण्यात सरकारला कुठं अपयश येतंय. सरकार का कमी पडतंय, याचा विचार सरकारने करायला हवा,'' असे फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, दुसरा लॉकडाऊन हा उपाय नाही, पण कोरोना नियमावलीचं सर्वांनीच पालन करायलं हवं. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचं आवाहन आम्ही जनतेला करतो, असेही फडणवीस यांनी म्हटलं.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख उच्चांक गाठत आहे. मात्र, राज्य सरकार यावर उपाययोजना करण्याच्या सोडून या सरकारचे मंत्रीच कोरोनाला संक्रमण वाढवत आहेत. आज पोहरादेवी येथे झालेली तुफान गर्दी याचेच एक उत्तम उदाहरण आहे. @OfficeofUTpic.twitter.com/Jt2cbkEjS3
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 23, 2021
सुमारे १५ दिवसानंतर संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहोरादेवी गडावर सर्व समाध्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे चालली. पत्रकार परिषदेची सुरुवातच संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचे नाव घेऊन केली आणि आपली बाजू मांडली. मात्र, पोहोरादेवी या बंजार समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या गडावर राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर आणि महाविकास आघाडीच सरकावर टीकास्त्र सोडले. तसेच, मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी भाजपाने केली आहे. राठोड यांच्या पोहोरागडावरील फोटो आणि व्हिडिओही भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहेत.
टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन
यवतमाळ, अमरावती अशा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढळत आहेत. अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाने काही अवधी देऊन लाॅकडाऊन लागू करावा. अचानक लॉकडाऊन लावणे किंवा अचानक सर्व सुरू करण्याचा प्रकार टाळण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिली.
मास्क हीच ढाल
कोरोनाच्या आजारावर सध्यातरी कोणतेही औषध निघालेले नाही. त्यामुळे या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे. कोरोनाच्या संपर्काची साखळी तोडणे, इतकेच आपल्या हाती आहे. हाँल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर मालकांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
होय, मीच जबाबदार!
माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेनंतर आता होय, मीच जबाबदार, या मोहिमेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मास्क घाला, सुरक्षित अंतर राखा, नियम पाळा आणि कोरोना टाळा. अन्यथा पुढील आठ दिवसांत आढवा घेऊन लाॅकडाऊन लावावा लागेल.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री