मुंबई : ठाणे जिल्ह्यातील रांजगोळी, रायचूर व रायगड जिल्ह्यातील कोल्हे येथे गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएकडून म्हाडाला प्राप्त होणाऱ्या २ हजार ५२१ घरांची लॉटरी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिले.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमांतर्गत मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये बॉम्बे डाइंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठीच्या लॉटरीतील १३१ यशस्वी पात्र गिरणी कामगार, वारस यांना सावे यांच्या हस्ते चावी देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.२०२० सालच्या गिरणी कामगारांसाठीच्या लॉटरीतील ३,०३८ पैकी ८५६ गिरणी कामगार, वारस यांना तीन टप्प्यांतर्गत चाव्यांचे वाटप करण्यात आले.
चौथ्या टप्प्यांतर्गत आयोजित कार्यक्रमात सावे म्हणाले, ५८ बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांत गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी १,७४,००० गिरणी कामगार, वारस यांनी २०१०, २०११, २०१७ मध्ये अर्ज केले. त्यापैकी १०,७०१ गिरणी कामगारांना घरे देण्यात आली. यापूर्वी झालेल्या लॉटरीमधील यशस्वी अर्जदार व दुबार अर्जदारांचे अर्ज वगळून ही संख्या १,५०,४८४ वर आली, तर काही गिरणी कामगारांनी पश्चिम महाराष्ट्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून, पश्चिम महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी काही योजना राबवता येईल का, याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
सप्टेंबरपर्यंत बॉम्बे डाइंग व श्रीनिवास मिलमधील ५०० यशस्वी पात्र गिरणी कामगार, वारस यांना चावीचे वाटप होईल. दसऱ्यापर्यंत या लॉटरीतील सर्व गिरणी कामगारांना चावी वाटपाचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्यातील कोन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या व २०१६ च्या लॉटरीतील १९४८ यशस्वी गिरणी कामगार / वारस यांना ऑक्टोबरमध्ये घराचा ताबा दिला जाईल.- आ. सुनील राणे, अध्यक्ष, गिरणी कामगार घर सनियंत्रण समिती