मुंबई - म्हाडा राज्यभरात एकूण ९ लॉटरी काढत असून, आतापर्यंत या माध्यमातून ३० हजार घरे देण्यात आली आहेत. आज म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी काढली जात असून, हा शुभ दिवस आहे. आता मार्च ते जून २०२५ दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाची घरांची तिसरी लॉटरी काढली जाईल, अशी घोषणा म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केली.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घरांची लॉटरी काढण्यात आली. यावेळी संजीव जयस्वाल बोलत होते. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह यावेळी उपस्थित होते.
अतुल सावे म्हणाले, मुंबईत घरांची मागणी जास्त आहे. त्यामुळे प्रीमियम घेऊन घरे उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. मुंबईचा विकास सुरू असून, विविध योजना सुरू आहेत. याद्वारे अधिकाधिक घरे उपलब्ध करून दिली जातील. नवीन हाउसिंग पॉलिसी आणत असून, त्यासाठी काम सुरू आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मुंबईत क्लस्टर योजना राबविल्या जात आहेत. यातून लाखो घरे बांधली जाणार आहेत. इतर अनेक प्रकल्प सुरू असून, यातून देखील घरे उपलब्ध होतील. घरांसाठी अनामत रकमेसह १ लाख १३ हजार ८११ अर्ज आले होते. म्हाडाच्या लॉटरी सहभाग घेतलेल्या अर्जदारांना निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.
'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून आहे. वेबकास्टिंगची लिंक https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर आहे. विजेत्या अर्जदारांची यादी https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल. लॉटरी विजेता ठरल्यानंतर अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे.