Join us

तरुणीला फसवून दुसरा विवाह

By admin | Published: May 24, 2015 1:05 AM

विवाहित तरुणाने २९ वर्षीय तरुणीला फसवून तिच्यासोबत दुसरा विवाह केल्याची घटना कांजूरमध्ये उघड झाली. तरुण विवाहित असल्याची कल्पना या तरुणीला नव्हती.

मुंबई : विवाहित तरुणाने २९ वर्षीय तरुणीला फसवून तिच्यासोबत दुसरा विवाह केल्याची घटना कांजूरमध्ये उघड झाली. तरुण विवाहित असल्याची कल्पना या तरुणीला नव्हती. तरुणाने तिच्याकडून लग्नाचा सर्व खर्च आणि आठ तोळे सोनेही उकळले. तरुणाची वैवाहिक पार्श्वभूमी समोर येताच तरुणीने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणासह एकूण आठ जणांना मुंबई, औरंगाबादेतून अटक केली आहे. तुषार कंटाळे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह वडील अशोक कंटाळे, आई शोभा, भाऊ अमोलसह नातेवाईक प्रमोद श्रीकृष्ण सूर्यवंशी, प्रकाश कंटाळे, शुभांगी अशोक कंटाळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी तुषारला २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली तर इतर आरोपींंची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.कांंजूर येथे राहणारी २९ वर्षीय सुजाता (नाव बदललेले आहे) आई वडील आणि तीन बहिणींसोबत राहते. गेल्या वर्षी नातेवाइकांच्या ओळखीने तिला तुषारचे मागणे आले होते. तुषार आदित्य बिर्ला कंपनीत कामाला तर वडील बीएसएनल कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मुलाची चांगली नोकरी, त्यात उच्चशिक्षित कुटुंब असल्याने सुजाताच्या कुटुंबीयांनी तुषारला लग्नासाठी होकार दिला. लग्नासाठी तुषारच्या कुटुंबीयांनी ८ तोळे सोने आणि लग्नाचा सर्व खर्च उचलण्याची अट घातली. त्यानुसार तुषारच्या कुटुंबीयांना दागिने देण्यात आले. ८ मे २०१४ रोजी सुजाताचे तुषारसोबत लग्न झाले. लग्नानंतर ती पतीसोबत औरंगाबाद येथे स्थायिक झाली. लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर तुषारचा दुसरा विवाह झाल्याचे तिला समजले. मात्र सुरुवातीला त्याच्यावर तिचा विश्वास बसला नाही. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात तुषारची पहिली पत्नी नीता (नाव बदलले आहे) घरी आल्यानंतर सुजाताच्या पायाखालची जमीनच सरकली. खोटारडेपणा उघड होताच तुषारने सुजाताला त्रास देण्यास सुरुवात केली. या मानसिक तसेच शारीरिक त्रासाला कंटाळून ती माहेरी निघून आली. मात्र सुजाताने अखेर ९ महिन्यांनी शनिवारी कांजूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सुजाताच्या तक्रारीवरून कांजूर पोलिसांनी औरंगाबाद येथून तुषारसह त्याच्या कुटुंबीयांच्या मुसक्या आवळल्या. केवळ पैशासाठी मुलींची फसवणूक करणाऱ्या अशा आरोपींना कडक शासन होणे गरजेचे असल्याचे सुजाताने लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)