एका मेट्रोच्या डोक्यावर धावणार दुसरी मेट्रो; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 07:10 AM2023-01-13T07:10:26+5:302023-01-13T07:10:35+5:30
उर्वरित मार्गावरील सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.
मुंबई : पश्चिम उपनगरांत उभारण्यात आलेल्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या उर्वरित मार्गावरही आता मेट्रो वेगाने धावू लागणार आहे. उर्वरित मार्गावरील सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. १९ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गावरील गुंदवली मेट्रो स्थानकाचा आढावा घेतला असून, मेट्रो ७, मेट्रो २ अ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
प्रकल्पांचे लाेकार्पण
योगायोग म्हणजे या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते झाले होते. आता येत्या १९ जानेवारीला मेट्रो मार्गाचे उद्घाटन होत आहे. मेट्रो मार्गाव्यतिरिक्त काँक्रीटचे रस्ते, एसटीपी प्लांट, आरोग्याचे विषय, सुशोभीकरण, आदींचेही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
मेट्रो मार्ग ७ची वैशिष्ट्ये
टप्पा १ : १०.९०२ किमी, ९ स्थानके, आरे ते दहिसर पूर्व
स्थानके : ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा,
मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे
टप्पा २ : ५.५५२ किमी, ४ स्थानके, गुंदवली ते आरे
स्थानके : गोरेगाव पूर्व, जोगेश्वरी पूर्व, मोगरा, गुंदवली
मेट्रो २ अ
टप्पा १ : ९.८२८ किमी, ९ स्थानके, डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व
स्थानके : दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली पश्चिम, पहाडी एकसर, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी
टप्पा २ : ८.७६८ किमी, वळनाई ते अंधेरी पश्चिम
स्थानके : वळनई, मालाड पश्चिम, लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव पश्चिम, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम
मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ अ चा ३५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. ३३ स्थानके सेवेत दाखल होणार आहेत. अंधेरी, दहिसर, वर्सोवा परिसरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल. लाखो नागरिकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. आरामदायी प्रवास करता येणार आहे. मेट्रो लाखो प्रवाशांना वरदान ठरेल.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री