Join us

कोरोनामुळे आणखी एका मुंबई पोलिसाचा मृत्यू, आत्तापर्यंत 57 पोलिसांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:44 AM

दीपक गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता, त्यांच्यावर चर्ची रोड येथील रिलायन्स हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. शनिवारी संध्याकाळी उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई - राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून गेल्या तीन दिवसांत तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतच बाधित झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली असून राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या 56 होती. तो आकडा आणखी 1 ने वाढून 57 पर्यंत पोहोचला आहे. धारावी पोलीस ठाण्यातील 55 वर्षीय दिपक गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

दीपक गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता, त्यांच्यावर चर्नी रोड येथील रिलायन्स हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. शनिवारी संध्याकाळी उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. कोरोना पॉझिटीव्हसह त्यांना डायबेटीजचाही आजार होता. पोलीस शिपाई दीपक गायकवाड यांच्या मृत्युनंतर मुंबई पोलिसांतील मृतांचा आकडा 38 वर गेला आहे. दीपक गायकवाड हे माहीम पोलीस कॉलनीत वास्तव्यास होते. आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह त्यांचा सुखी संखार आनंदात सुरु होता. मोठा मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत असून मुलगी शालेय शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या महामारीने त्यांच्या आनंदी कुटुंबात दु:खाचा डोंगर कोसळला. 

गायकवाड यांनी 16 एप्रिलपर्यंत ड्युटी बजावली असून 17 एप्रिलपासून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा कोरोना स्वॅब घेण्यात आला, त्यामध्ये 15 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना तात्काळ सेव्हन हील्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तर, 6 जून रोजी त्यांना रिलायन्स हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले, तेथेच श्वसनाचा अधिक त्रास होऊन त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सध्या मुंबईतील 607 पोलिसांवर उपचार सुरु असून 2037 पोलीसांनी कोरोनावर मात दिली आहे. तर, 26 जूनपर्यंत एकूण 2679 पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनावर मात देऊन बरे झालेल्या 1190 पोलिसांनी पुन्हा आपली ड्युटी ज्वॉईन केली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिसमुंबई