दक्षिण मुंबईत आणखी एक नवे मेडिकल कॉलेज; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 08:38 AM2024-07-04T08:38:03+5:302024-07-04T08:38:35+5:30
यंदा ५० विद्यार्थ्यांना प्रवेश, सध्या राज्यात ६६ वैद्यकीय महाविद्यालये असून, ८१२० विद्यार्थ्यांची क्षमता आहे.
मुंबई - अनेक प्रयत्नांनंतर अखेर दक्षिण मुंबईत नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने बुधवारी परवानगी दिली. याकरिता जे. जे. रुग्णालयाच्या अखत्यारीतील जी. टी. आणि कामा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. या दोन रुग्णालयांचे रूपांतर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई असे करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी एमबीबीएससाठी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
१८ नोव्हेंबर रोजी ‘दक्षिण मुंबईला मिळणार मेडिकल कॉलेज’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.वैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी ५० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिल्याचे सांगितले. राज्य शासनाचे दक्षिण मुंबईत सर जे. जे. रुग्णालय असून, त्याला संलग्न ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आहे. या रुग्णालयांतर्गत आणखी जी. टी. कामा आणि सेंट जॉर्जेस अशी रुग्णालये आहेत. यापैकी जी. टी. रुग्णालयाचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तसेच ३१ जानेवारी २०१२ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने नवे कॉलेज सुरू करण्यास मान्यता दिली होती.
राहुल नार्वेकर यांचा पुढाकार
गेल्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांनी त्यांच्या दालनात हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी विशेष बैठक घेतली होती. त्या बैठकीला सामान्य प्रशासन सचिव, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, जे. जे. रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता आणि सार्वजनिक विभागाचे प्रमुख अभियंता उपस्थित होते. त्यावेळी नार्वेकर यांनी या महाविद्यालयाला परवानगी मिळविण्यासाठी वैद्यकीय आयोगाकडे २६ नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर चक्रे वेगाने फिरली. काही दिवसांतच महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाचे सक्षमता प्रमाणपत्र आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नीकरण प्रमाणपत्र मिळाले.
सध्या राज्यात ६६ वैद्यकीय महाविद्यालये असून, ८१२० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्यामध्ये २५ वैद्यकीय महाविद्यालये राज्य शासनाची असून, त्यांची विद्यार्थी क्षमता ३९५० आहे. महापालिकेची ५ वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यांची विद्यार्थी क्षमता ९०० आहे. एक वैद्यकीय महाविद्यालय अनुदानित असून, त्याची विद्यार्थी क्षमता १०० आहे. २२ खासगी महाविद्यालये असून, त्यांची विद्यार्थी क्षमता ३१७० इतकी आहे.
दोन रुग्णालयांचे संलग्नीकरण
सर्वसाधारणपणे एमबीबीएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी लागणाऱ्या सर्व विषयांचे विभाग, लेक्चर हॉल, रुग्णालयातील विशिष्ट बेड्सची संख्या, प्रयोगशाळा या आणि अशा तत्सम गोष्टींची गरज असते. त्याची पूर्तता करता यावी म्हणून कामा रुग्णालयाची मदत लागणार असल्याने त्या दोन्ही रुग्णालयांचे संलग्नीकरण करण्यात आले आहे.
अध्यापकांची गरज
हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी विविध पदांवरील ५६ अध्यापकांची नुकतीच नेमणूक झाली आहे. मात्र, कायमस्वरूपी अध्यापकांची गरज आहे. त्यामुळे या महाविद्यालयासाठी आणखी काही अध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे.