गुंजाळ हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
By admin | Published: January 6, 2016 01:52 AM2016-01-06T01:52:50+5:302016-01-06T01:52:50+5:30
रमेश गुंजाळ प्रकरणात ज्या १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता त्यातील चौघांना पोलिसांनी या आधीच ताब्यात घेतले.
अंबरनाथ : रमेश गुंजाळ प्रकरणात ज्या १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता त्यातील चौघांना पोलिसांनी या आधीच ताब्यात घेतले. तर या प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र १३ आरोपींमध्ये नाव नसलेल्या इतर चार आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. गुंजाळ हत्या प्रकरणात सर्वात आधी हजर झालेले सचिन चव्हाण, संदीप गायकर, विशाल जव्हेरी, दीपक काळींबे या आरोपींना आधी ६ दिवस नंतर ३ दिवस आणि मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मंगळवारी त्यांना २ दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. या चौघांकडून पोलिसांना तपासासाठी काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्या आधारे पोलिसांनी अभिषेक (गुड्डू) वारगडे याच्यासह सचिन गायकर, शिवदास गायकर, रुपेश सासे आणि पवन कांडेकर यांना ताब्यात घेतले. या पाच जणांना अटक करण्याआधीच वारगडे वगळता इतर चौघांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यांना न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र तो केवळ ११ जानेवारीपर्यंत राहणार आहे. या चार आरोपींचा हत्येशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयापुढे सादर केल्यावरच त्यांना पोलीस कोठडी देण्यात येणार आहे. फिर्यादीमध्ये या चौघांची नावे नसली तरी या हत्येशी संबंध असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. तर १३ आरोपींची नावे फिर्यादीने दिली होती त्यातील गुड्डू वारगडेला न्यायालयात हजर केले असता ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. वारगडेकडून हत्येची काही माहिती मिळते का यावर पोलिसांचा पुढील तपास ठरेल.