कमला मिल आग प्रकरणी आणखी एकाला अटक; वन अबव्हच्या दोन्ही व्यवस्थापकांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:36 AM2018-01-10T01:36:03+5:302018-01-10T01:36:06+5:30
कमला मिल आग प्रकरणी मंगळवारी विशाल करियाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तो हॉटेल व्यावसायिक आहे. त्याच्याकडे वन अबव्हचा फरार संचालक अभिजीत मानकरची गाडी सापडली आहे, तर दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या वन अबव्हच्या दोन्ही व्यवस्थापकांना मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबई : कमला मिल आग प्रकरणी मंगळवारी विशाल करियाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तो हॉटेल व्यावसायिक आहे. त्याच्याकडे वन अबव्हचा फरार संचालक अभिजीत मानकरची गाडी सापडली आहे, तर दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या वन अबव्हच्या दोन्ही व्यवस्थापकांना मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जीगर संघवी, अभिजीत मानकर, व्यवस्थापक, मोजोसचे मालक युग पाठक, युग तुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाठकला बेड्या ठोकल्या. तर वन अबव्हचे तिघेही संचालक फरार आहेत. तिघांचा शोघ सुरू असताना ३ जानेवारीला मानकरची गाडी रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दिशेने तपास सुरू झाला आणि मंगळवारी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी जुहू परिसरातून हॉटेल व्यावसायिक विशाल करियाला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून मानकरची गाडी जप्त केली. २९ डिसेंबरच्या पहाटे साडेतीन वाजता क्रिपेश संघवीने ही गाडी त्याला आणून दिली होती. त्यानंतर, तो या गाडीचा वापर करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे तिघांच्या फरार होण्यामागचे गूढ वाढले आहे. आरोपींना फरार होण्यात मदत केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. करिया याचे हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, क्रिकेटपटूंसोबत जवळचे संबंध असल्याची माहितीही उघडकीस आली आहे. सेलिब्रिटींसोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. दुसरीकडे वन अबव्हचे दोन व्यवस्थापक केवीन बावा, लिसबन लोपेज यांना मंगळवारी भोईवाडा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.