एमएमआरडीएने मागितली आरेतील आणखी एक जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:03 AM2019-09-07T06:03:44+5:302019-09-07T06:04:05+5:30
मेट्रो-६ मार्गिकेचे कारशेड उभारणार; पर्यावरणप्रेमींचा विरोध
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) घेण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. त्यातच आता स्वामी समर्थ-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६ मार्गिकेसाठी आरेतील २९ हजार ८६९ चौरस फुटांच्या जागेची एमएमआरडीएकडून मागणी करण्यात आली आहे. येथे प्रकल्प कार्यालय, मजुरांची वसाहत, कारशेड उभारण्यात येणार आहे. मात्र याला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला आहे.
एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी यांनी दुग्धविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यांना ३ जुलै रोजी पत्र पाठवले होते. या पत्रात जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडजवळील २९ हजार ८६९ चौरस फूट जागेची मागणी करण्यात आली आहे. तसेच मेट्रोचे प्रस्तावित प्रकल्प हे राज्य सरकारच्या अग्रस्थानी असल्याने जागेचे अधिग्रहण लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचेही यात नमूद केले आहे.
एमएमआरसीकडून याआधी मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरेमधील २ हजार ७०२ झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला होता. हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजूर झाला आहे.
पालिकेने दिलेल्या या मंजुरीला विरोध करत पर्यावरणप्रेमींनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आरे कॉलनीला दुसरे
वांद्रे-कुर्ला-संकुलाप्रमाणे बनवायचे आहे, म्हणूनच तर आरेतील जागा गिळंकृत करण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.
मेट्रोभवन असताना मेट्रो-६ चे वेगळे कारशेड आरेत कशासाठी?
एमएमआरडीएमार्फत आरेमध्ये मेट्रो भवन बांधण्यात येणार आहे. ते १५४ मीटर उंच आणि ३२ मजल्यांचे असेल. मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये निर्माण होणाऱ्या मेट्रो मार्गिकांवर या मेट्रो भवनमधून नियंत्रण ठेवण्यात येईल. हे मेट्रो भवन इतर कोणत्याही जागेवर उभारता येऊ शकते. तरीही त्यासाठी आरेची जागाच वापरण्यात येणार आहे. त्यातच आता मेट्रो-६ मार्गिकेचे कारशेडही आरेच्या जागेवरच उभारण्याचा विचार सुरू आहे. या जागेवर आधीच मेट्रोभवन उभारले जात असताना त्यात आता मेट्रो-६ चे वेगळे कारशेड कशासाठी, असा सवाल पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.