मुंबईचे आणखी एक ठिकाण ‘हेरिटेज’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 03:01 AM2018-06-25T03:01:30+5:302018-06-25T03:01:33+5:30
मनामा : पहिल्या विश्व युद्धातील स्मशानभूमी, मुंबईतील आर्ट डेको हेरिटेज आणि इटलीतील वाइन निर्मिती करणारा भाग आदी ३० ठिकाणांना यूनेस्कोच्या यादीत समाविष्ट होण्याची आशा आहे. वर्ल्ड हेरिटेज समिती बहरीनमध्ये यावर चर्चा करणार आहे.
केन्यातील लेक तुर्काना आणि नेपाळमधील काठमांडू व्हॅली यांचाही यादीसाठी विचार केला जात आहे. भारतातील मुंंबईमधील कलेक्शन आॅफ व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको लँडमार्क हे वास्तुकलेतील आदर्श आहेत. दक्षिण मुंबईतील हायकोर्ट परिसरातील इमारतींचा या यादीत समावेश होऊ शकतो. पहिल्या विश्वयुद्धातील फ्रान्स आणि बेल्जियममधील स्मारक स्थळांचाही यासाठी विचार केला जात आहे. हिरोशिमा आणि औशविट्ज ही स्थळे पूर्वीपासूनच यूनेस्कोच्या यादीत आहेत.
यादीत स्थान मिळाल्यास अशा ठिकाणी साहजिकच पर्यटकांची गर्दी वाढते आणि निधीही मिळतो. त्यामुळे अशा यादीत स्थान मिळणे हे वरदान ठरते. ज्या ऐतिहासिक ठिकाणांची सुरक्षा योग्य पद्धतीने होत नाही त्या स्थळांना यादीतून हटविण्याचा विचार समिती करत आहे.
उझबेकिस्तानमधील शाक्रीसाइब या ऐतिहासिक केंद्राचा या यादीत २००० मध्ये समावेश करण्यात आला होता. यूनेस्कोसाठी हा संवेदनशील काळ आहे. कारण, अमेरिका बाहेर पडल्यानंतर शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संघटना निधीसाठी संघर्ष करत आहे.